Thane Crime : मदतीला धावून गेला अन् मृत्यूने गाठलं; क्रिकेटच्या मैदानावरील वादात मध्यस्थी करणं जिवावर बेतलं
Last Updated:
Thane Crime News : ठाणे शहरातून एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे. जिथे मैदानात झालेल्या वादात एका तरुणाला जीव गमवावा लागला आहे. मात्र नेमकं काय घडलं असेल ते जाणून घेऊयात.
मुंबई : ठाणे शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची दिसून येत आहे. अशातच पुन्हा एकदा ठाण्यातील नौपाडा परिसरात चाकू हल्ल्याची धक्कादायक घटना घडून 26 वर्षीय रोहित मोरे याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी नौपाडा पोलिसांनी रोहित पटनेशा (वय24) आणि विष्णू चव्हाण (वय24) या दोघांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
मैदानावरील वादात मध्यस्थी करणं जिवावर बेतलं
मिळालेल्या माहितीनुसार, गावदेवी मैदान परिसरात क्रिकेट खेळताना एका 13 वर्षीय मुलाचा वाद झाला होता. या वादातून पटनेशा आणि चव्हाण यांनी त्या अल्पवयीन मुलाला मारहाण केली. हा प्रकार पाहून रोहित मोरे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र याच हस्तक्षेपातून वाद अधिक वाढत गेला.
यानंतर मोरे, अमित कीर आणि आरोपी यांच्यात जोरदार शाब्दिक वाद झाला. काही क्षणांतच या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. मात्र हा प्रकार एवढा वाढला की आरोपी पटनेशा आणि चव्हाण यांनी चाकू काढून रोहित मोरे व अमित कीर यांच्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात रोहित मोरे गंभीर जखमी झाला आणि रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
advertisement
घटनेची माहिती मिळताच नौपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबांच्या आधारे दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून क्रिकेटच्या किरकोळ वादातून जीवघेणी घटना घडल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 05, 2026 9:27 AM IST
मराठी बातम्या/ठाणे/
Thane Crime : मदतीला धावून गेला अन् मृत्यूने गाठलं; क्रिकेटच्या मैदानावरील वादात मध्यस्थी करणं जिवावर बेतलं








