रेल्वेचा मोठा निर्णय, ठाणे-मुलुंड दरम्यान नवं स्टेशन, लाखो प्रवाशांना दिलासा
- Reported by:Bhavna Arvind Kamble
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Thane Railway: ठाणे-मुलुंड दरम्यान नवं रेल्वे स्टेशन सुरू करण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून होत आहे. आता याबाबत रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे.
ठाणे: ठाणे आणि मुलुंड दरम्यान प्रस्तावित असलेल्या नवीन उपनगरीय रेल्वे स्थानकाच्या रखडलेल्या प्रकल्पाला अखेर गती मिळाली आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी थेट दूरध्वनीवर संवाद साधत या स्थानकाचे उर्वरित सर्व काम तत्काळ सुरू करण्यात येईल आणि त्यासाठी लागणारा संपूर्ण खर्च रेल्वे प्रशासन उचलणार असल्याची ग्वाही दिली आहे. या निर्णयामुळे ठाणे–मुलुंड परिसरातील लाखो रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
खासदार नरेश म्हस्के यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, प्रवाशांची वाढती संख्या, विद्यमान स्थानकांवरील प्रचंड गर्दी आणि परिसराचा वेगाने होत असलेला शहरी विकास लक्षात घेता ठाणे आणि मुलुंडदरम्यान नवीन उपनगरीय रेल्वे स्थानकाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. या प्रकल्पाला मंजुरी मिळूनही विविध प्रशासकीय आणि आर्थिक अडचणींमुळे प्रत्यक्ष काम रखडले होते.
advertisement
प्रकल्पाचे काम रखडले
हा प्रकल्प ‘स्मार्ट सिटी मिशन’ अंतर्गत मंजूर करण्यात आला होता. ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेडकडून या प्रकल्पातील सुमारे 60 टक्के काम पूर्णही करण्यात आले होते. सुरुवातीला या प्रकल्पाचा खर्च सुमारे 120 कोटी रुपये अपेक्षित होता. मात्र कालावधी वाढल्याने आणि बांधकाम खर्चात झालेल्या वाढीमुळे हा खर्च 245 कोटी रुपयांहून अधिक झाला. दरम्यान यावर्षी मार्च महिन्यात ‘स्मार्ट सिटी मिशन’चा कालावधी संपल्याने अतिरिक्त निधी उपलब्ध होऊ शकला नाही आणि त्यामुळे प्रकल्पाचे काम पूर्णपणे थांबले.
advertisement
रेल्वे मंत्र्यांकडे मागणी
या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशनादरम्यान खासदार नरेश म्हस्के आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन या रखडलेल्या प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा केली. प्रवाशांच्या दैनंदिन अडचणी लक्षात घेता स्थानकाचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी त्यांनी केली होती.
रेल्वे प्रशासनाने घेतली जबाबदारी
view commentsअखेर केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी या प्रकल्पाची जबाबदारी थेट रेल्वे प्रशासनाकडे घेण्याचा निर्णय घेत संपूर्ण निधी रेल्वेच उपलब्ध करून देईल असे स्पष्ट केले. या निर्णयामुळे आता मुलुंडजवळील नवीन उपनगरीय रेल्वे स्थानकाचे काम वेगाने पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला असून भविष्यात ठाणे–मुलुंड परिसरातील रेल्वे वाहतूक अधिक सुलभ होणार आहे.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
Dec 20, 2025 10:04 AM IST






