मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी सुटणार, मोठ्या प्रकल्पाला गती, फेब्रुवारीत उद्घाटन!
- Reported by:Bhavna Arvind Kamble
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडीचं टेन्शन लवकरच संपणार आहे. ठाण्यातील महत्त्वाचा प्रकल्प लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार आहे.
मुंबई: नाशिक महामार्गावरील वडपे ते ठाणे दरम्यानच्या रस्ता रुंदीकरण व काँक्रीटीकरण प्रकल्पाने अखेर गती घेतली आहे. या प्रकल्पाचे सुमारे 81 टक्के काम पूर्ण झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे कशेळी व कळवा खाडीपूल फेब्रुवारीच्या सुरुवातीस सेवेत दाखल करण्यात येणार असल्याची माहिती एमएसआरडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) 2019 मध्ये 23.5 किलोमीटर लांबीच्या वडपे–माजीवडा–ठाणे महामार्गाच्या रुंदीकरण व काँक्रीटीकरणाच्या कामाला सुरुवात केली होती. मात्र विविध तांत्रिक, प्रशासकीय व पर्यावरणीय अडचणींमुळे हे काम वेळेत पूर्ण होऊ शकले नाही. परिणामी 2021 मध्ये हा प्रकल्प एमएसआरडीसीकडे हस्तांतरित करण्यात आला. पर्यावरण परवानगी मिळण्यास विलंब झाल्याने प्रत्यक्ष कामाला 2022 मध्ये सुरुवात झाली.
advertisement
या विलंबामुळे लोकप्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली होती. काही महिन्यांपूर्वी या प्रकरणाशी संबंधित एका वरिष्ठ अधिकाऱ्याचे निलंबनही करण्यात आले होते. मात्र आता प्रकल्प वेगाने पूर्णत्वाकडे जात आहे. एकूण 23.80 किमीपैकी 19.20 किमी रस्त्याचे काँक्रीटीकरण पूर्ण झाले आहे.
advertisement
वडपे–उम्राणपुलाचे 86 टक्के काम पूर्ण झाले असून जानेवारी अखेरीस तो पूल पूर्ण होणार आहे. रेल्वे उड्डाणपुलाचे काम 70 टक्के पूर्ण झाले असून तो मार्चअखेरीस सेवेत येणार आहे. करोळी खाडीपुलाचे 92 टक्के, तर कळवा खाडीपुलाचे तब्बल 98 टक्के काम पूर्ण झाले आहे. हे पूल सुरू झाल्यानंतर मुंबई–नाशिक महामार्गावरील सुमारे 90 टक्के वाहतूक कोंडी दूर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
advertisement
दरम्यान, वेवई, वालशिद, सोना, सरवली, पिंपळास आणि मोटागाव–मानकोली येथील भुयारी मार्गांचे 100 टक्के काम पूर्ण झाले असून एप्रिलच्या सुरुवातीला ते वाहतुकीसाठी खुले करण्यात येणार आहेत. दिवेगाव, दिवे व खारेगाव येथील भुयारी मार्गांचे काम अनुक्रमे 63, 65 आणि 26 टक्के पूर्ण झाले असून उर्वरित काम फेब्रुवारी–मार्चदरम्यान पूर्ण होणार आहे.
हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई–नाशिक प्रवास अधिक सुरक्षित, जलद आणि सुकर होणार असल्याचा दावा एमएसआरडीसीकडून करण्यात आला आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 20, 2025 9:35 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी सुटणार, मोठ्या प्रकल्पाला गती, फेब्रुवारीत उद्घाटन!










