Thane: '...नाहीतर विरोधी बाकावर बसू', एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपचा नवा डाव
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
ठाण्यात महापौर पदासाठी भाजप आणि शिवसेना यांच्यात संघर्ष वाढला आहे. निरंजन डावखरे यांनी भाजपला महापौर पद द्यावे अशी मागणी केली असून निर्णय फडणवीस आणि शिंदे यांच्या हातात आहे.
अजित मांढरे, प्रतिनिधी ठाणे: मुंबई महानगरपालिकेत महापौर पदावरुन घमासान सुरू आहे. उद्धव ठाकरेंशी देखील मुख्यमंत्री फडणवीस चर्चा करत असल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात ठाण्यात चक्क महापौर पदासाठी भाजपने दावा केला आहे. भाजप नेत्याने चक्क केडीएमसी, उल्हासनगर आणि ठाण्यातील महापौर पदावर दावा केल्याची माहिती मिळाली आहे. ठाण्यात भाजपचे 28 तर सेनेचे 75 नगरसेवक निवडून आले आहेत. ठाण्यात जागा वाटापाबाबत भाजपने माघात घेतली होती, त्यामुळे आता महापौरपद हे भाजपकडे द्यावं अशी मागणी केली जात आहे.
ठाणे महानगरपालिका निवडणुकीत महायुतीने वर्चस्व राखले असले, तरी आता अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. भाजपचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष आणि आमदार निरंजन डावखरे यांनी ठाण्यात भाजपचा महापौर असावा, अशी आक्रमक मागणी केली आहे. विशेष म्हणजे, ही मागणी मान्य न झाल्यास भाजप सत्तेत सहभागी न होता विरोधी बाकावर बसेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
advertisement
५ वर्षांच्या कार्यकाळात किमान २ वर्षे भाजपला महापौर पद मिळावे. १००% स्ट्राईक रेटने ठाण्यात भाजपने ज्या जागा लढवल्या, तिथे त्यांचा निकाल सर्वोत्तम आहे, असा दावा भाजपने केला आहे. निवडणुकीवेळी युती धर्म पाळण्यासाठी भाजपने अनेक जागांवर नमते घेतले होते, आता त्याची परतफेड सत्तेत वाटा देऊन व्हावी, असे भाजपचे म्हणणे आहे. पारदर्शक कारभार आणि जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी महत्त्वाची पदे भाजपच्या ताब्यात असणे आवश्यक असल्याचे आमदार डावखरे यांनी स्पष्ट केले.
advertisement
ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. इथे शिंदे यांच्या शिवसेनेने स्वबळावर बहुमत (७५ जागा) मिळवले असून त्यांना भाजपच्या पाठिंब्याची तांत्रिक गरज नाही. मात्र, राज्यात महायुतीची सत्ता असल्याने आणि मुंबईत भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्याने, मुंबईत शिंदेंना मदत करण्याच्या बदल्यात भाजप ठाण्यातून काहीतरी पद पदरात पाडून घेण्याच्या तयारीत आहे.
advertisement
निरंजन डावखरे यांच्या या पवित्र्यामुळे आता चेंडू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोर्टात आहे. ठाण्यात सत्ता राखण्यासाठी शिंदेंना भाजपचा 'धक्का' सहन करावा लागणार की भाजप खरोखरच सत्तेबाहेर राहून 'चौकीदार'ची भूमिका बजावणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ठाण्यात सध्या आरपारची लढाई सुरू आहे तर एकनाथ शिंदे आपली ताकद आणि वर्चस्व राखण्यासाठी काय नवा डाव खेळणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
Jan 19, 2026 1:46 PM IST
मराठी बातम्या/ठाणे/
Thane: '...नाहीतर विरोधी बाकावर बसू', एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपचा नवा डाव









