Donald Trump : अमेरिकेत पुन्हा ट्रम्प सरकार, दुसऱ्यांदा घेतली राष्ट्राध्यक्षपदाची शपथ
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची पुन्हा एकदा शपथ घेतली आहे. डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष झाले आहेत.
वॉशिंग्टन : डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची पुन्हा एकदा शपथ घेतली आहे. डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष झाले आहेत. ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. खचाखच भरलेल्या कॅपिटल रोटुंडा हॉलमध्ये ट्रम्प यांचा शपथविधी सोहळा पार पडला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीला जगभरातील दिग्गजांनी हजेरी लावली. या सोहळ्याला 800 पाहुण्यांनी हजेरी लावली, तर कॅपिटल बिल्डिंगमध्ये 1,300 पाहुणे तर कॅपिटल व्हिजिटर सेंटरच्या थिएटरमध्ये 500 पाहुणे उपस्थित होते. शपथ घेण्याआधी ट्रम्प यांनी अमेरिकेचे मावळते अध्यक्ष जो बायडेन यांची व्हाईट हाऊसमध्ये जाऊन भेट घेतली.
भारताकडून परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर या समारोहात सहभागी झाले. जयशंकर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाठवलेला अभिनंदनाचा संदेश डोनाल्ड ट्रम्प यांना देणार आहेत. अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टीस यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्षपदाची शपथ दिली.
डोनाल्ड ट्रम्प यांचा राष्ट्राध्यक्षपदापर्यंतचा प्रवास
डोनाल्ड ट्रम्प यांनी पेन्सेल्वेनिया विद्यापीठाच्या व्हॉर्टन स्कूलमधून पदवी घेतली. यानंतर त्यांनी कौटुंबिक व्यवसायाची जबाबदारी स्वीकारली. ट्रम्प हे न्यूयॉर्कचे प्रसिद्ध रिअल इस्टेट व्यावसायिक आहेत. वडिलांकडून ट्रम्प यांनी 1 मिलियन डॉलरचं कर्ज घेतलं आणि न्यूयॉर्क शहरात अनेक वसाहती उभारल्या. ट्रम्प यांनी जगभरातील अनेक बांधकाम प्रकल्प उभारले, तसंच त्यांनी मिस युनिव्हर्स स्पर्धा सुरू केली. याशिवाय ट्रम्प यांनी अनेक पुस्तकंही लिहिली आहेत.
advertisement
2000 मध्ये रिफॉर्म पार्टीकडून ट्रम्प यांना उमेदवारी देण्यात आली, त्यानंतर 2015 साली ट्रम्प यांची राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत एण्ट्री झाली, त्यांच्याविरोधात हिलरी क्लिंटन यांना उमेदवारी देण्यात आली, पण 2017 साली ट्रम्प पहिल्यांदाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले.
पहिल्या कार्यकाळात वाद
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात बरेच वाद पाहायला मिळाले. चीनमधील उत्पादनांवर ट्रम्प यांनी आयात कर लावला. तसंच 7 मुस्लिम बहुल देशांमधील नागरिकांवरही ट्रम्प यांनी निर्बंध लावले. ट्रम्प यांच्यावर 2019 मध्ये महाभियोग खटलाही चालवला गेला. कोरोना काळात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ट्रम्पवर ठेवण्यात आला. यानंतर 2020 च्या निवडणुकीत बायडन यांच्याकडून ट्रम्प यांचा पराभव झाला. आता चार वर्षांनी पुन्हा एकदा ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. नोव्हेंबर 2024 मध्ये झालेल्या निवडणुकीत ट्रम्प विजयी झाले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 20, 2025 10:55 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
Donald Trump : अमेरिकेत पुन्हा ट्रम्प सरकार, दुसऱ्यांदा घेतली राष्ट्राध्यक्षपदाची शपथ