Israel Vs Iran war Live Update: ज्याची भीती संपूर्ण जगाला वाटत होती, अखेर तेच घडलं आहे. मध्य-पूर्वेत युद्धाचा वणवा पेटला असून इस्रायलने इराणवर थेट आणि मोठा हल्ला केला आहे. शनिवारी पहाटे इराणची राजधानी तेहरानसह अनेक शहरे भीषण स्फोटांनी हादरली आहेत. "आम्ही इराणच्या लष्करी तळांना लक्ष्य करत आहोत," असं अधिकृत निवेदन इस्रायलने जारी केलं असून, या हल्ल्यामुळे आता संपूर्ण जगात युद्धाला तोंड फुटलं आहे.
इराणवरील अमेरिका-इस्रायली हल्ल्यांदरम्यान इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी एक मोठे विधान केले आहे. त्यांनी तेहरानमध्ये सत्ताबदलाचे आवाहन केले आणि इराणी लोकांना सरकारविरुद्ध उठण्याचे आवाहन केले. नेतन्याहू यांनी सांगितले की संयुक्त कारवाईचा उद्देश इराणी लोकांना त्यांचे स्वतःचे भविष्य ठरवण्याची संधी देणे आहे. त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले आणि सांगितले की इराणी सरकारला अण्वस्त्रे मिळवू दिली जाणार नाहीत आणि ही कारवाई जागतिक सुरक्षेसाठी आवश्यक आहे.
सीरिया आणि येमेन देखील या युद्धात सामील झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
इराणच्या बुशेहर बंदरावर इस्रायल आणि अमेरिकेच्या संयुक्त हल्ल्यांदरम्यान हल्ला करण्यात आला, असे राज्य माध्यमांनी शनिवारी सांगितले. तथापि, वीज प्रकल्पाचे नुकसान झाले आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
इराणने अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. 70 मिसाइल्स डागले आहेत. तेल अवीव इथे आणीबाणी लागू करण्यात आली आहे.
इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा आयोगाच्या प्रमुखांनी म्हटले, “आम्ही तुम्हाला इशारा दिला होता. आता तुम्ही अशा मार्गावर निघाला आहात ज्याचा अंत तुमच्या नियंत्रणाबाहेर आहे.”
मध्य पूर्वेतील वाढत्या युद्धसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, बहरीनमधील अमेरिकन दूतावासाने त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आदेश दिले आहेत. दूतावासाने अमेरिकन नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचा, घराबाहेर पडू नये आणि आवश्यक वस्तू सोबत ठेवण्याचा सल्ला दिला आहे. यापूर्वी, कतारमधील अमेरिकन दूतावासाने असाच इशारा जारी केला होता. वाढत्या हल्ल्यांमुळे संपूर्ण प्रदेश हाय अलर्टवर आहे.
युद्धाची दाहकता पाहता ब्रिटन, अर्जेंटिना, न्यूझीलंड, युक्रेन आणि आइसलँड यांसारख्या देशांनी तेहरानमधील आपले दूतावास रिकामे करण्यास सुरुवात केली आहे. कतारमधील अमेरिकन दूतावासानेही आपल्या कर्मचाऱ्यांना हाय अलर्टवर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
हल्ल्यानंतर इराणनेही आक्रमक पवित्रा घेतला आहे. “हल्ल्याची सुरुवात शत्रूने केली असली, तरी या युद्धाचा शेवट इराणच करेल,” असा इशारा इराणच्या लष्करी नेतृत्वाने दिला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून इराणने आपली सर्व विमानसेवा बंद केली आहे. दुसरीकडे, इस्रायलमध्येही आणीबाणी घोषित करण्यात आली असून नागरिकांना सुरक्षित बंकरमध्ये राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
हा केवळ एक छोटा हल्ला नसून, तो अनेक महिन्यांपासून आखलेला मोठा कट असल्याचे इस्रायली सूत्रांनी सांगितले आहे. अमेरिकेनेही या मोहिमेत इस्रायलला पूर्ण साथ दिली असून, हे हल्ले किमान पुढील चार दिवस सुरू राहू शकतात, असे संकेत मिळाले आहेत. इराकच्या आकाशातही क्रूझ मिसाइल्सचा संचार वाढल्याने इराकने आपली हवाई हद्द (Airspace) तात्काळ बंद केली आहे.
या हल्ल्यातील सर्वात खळबळजनक बाब म्हणजे इस्रायली लढाऊ विमानांनी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या निवासस्थानाला लक्ष्य करून ते उद्ध्वस्त केले आहे. मात्र, सुदैवाने खामेनी यांना हल्ल्याच्या काही वेळ आधीच एका सुरक्षित गुप्त बंकरमध्ये हलवण्यात आल्याने ते थोडक्यात बचावले आहेत. तेहरानमधील सुप्रीम कोर्ट, न्याय मंत्रालय आणि युनिव्हर्सिटी स्ट्रीट परिसरात भीषण स्फोट झाले असून संपूर्ण शहरात धुराचे लोट दिसत आहेत.
शनिवारची पहाट मध्य-पूर्वेसाठी काळरात्र ठरली आहे. ज्याची भीती संपूर्ण जगाला होती, अखेर तेच घडले असून इस्रायल आणि अमेरिकेने संयुक्तपणे इराणवर मोठा लष्करी हल्ला चढवला आहे. या ‘प्री-एम्प्टिव्ह स्ट्राईक’मध्ये इराणची राजधानी तेहरानसह इस्फहान, कोम आणि खोर्रमाबाद यांसारखी महत्त्वाची शहरे क्षेपणास्त्रांच्या वर्षावाने हादरली आहेत.



