थरारक विमान अपघात, हवेत इंजिन बंद झालं; 50 प्रवाशांसह हिंद महासागरात क्रॅश, पंख तुटले, इंजिन पेटलं
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Plane Crashes In Sea: मोगादिशूमध्ये 50 प्रवाशांना घेऊन जाणारे विमान उड्डाणानंतर काही क्षणांतच हिंद महासागरात कोसळले. मात्र पायलटच्या प्रसंगावधानामुळे सर्व 50 प्रवाशांचा जीव वाचला असून हा एक मोठा चमत्कार मानला जात आहे.
मोगादिशू : सोमालियाची राजधानी मोगादिशू येथे मंगळवारी एक थरारक विमान अपघात घडला. अदन अद्दे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही क्षणांतच 50 प्रवाशांना घेऊन जाणारे स्टार स्काय एअरलाइन्सचे विमान हिंद महासागरात कोसळले. मात्र पायलटच्या प्रसंगावधानामुळे आणि धाडसी निर्णयामुळे या भीषण अपघातात एकही जीवितहानी झाली नाही.
उड्डाणानंतर लगेचच बिघाड
स्टार स्काय एअरलाइन्सचे हे विमान मंगळवारी दुपारी मोगादिशू येथील अदन अद्दे विमानतळावरून गुरिएल भागाच्या दिशेने रवाना झाले होते. विमान अजून पूर्ण उंचीवर पोहोचले नव्हते, तोच अचानक तांत्रिक बिघाड झाला. इंजिनने काम करणे बंद केले आणि विमानाचा ताबा सुटू लागल्याचे पायलटच्या लक्षात आले.
त्या वेळी विमानात 50 प्रवासी होते. परिस्थितीची गंभीरता ओळखत पायलटने विमान पुन्हा विमानतळाकडे वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र रनवेपर्यंत पोहोचणे अशक्य असल्याचे लक्षात येताच त्याने मोठा निर्णय घेतला.
advertisement
समुद्राकडे वळवले विमान
पायलटने विमानतळालगत असलेल्या हिंद महासागराच्या किनाऱ्याच्या दिशेने विमान वळवले. लँडिंग अत्यंत भीषण होती. धडकेत विमानाचे पंख तुटून वेगळे झाले आणि विमान नियंत्रणाबाहेर जाऊन समुद्रकिनाऱ्याजवळ कोसळले.
या अपघातामुळे काही क्षणांसाठी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. इंजिन निकामी झाले होते आणि विमानाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. तरीही पायलटच्या धाडसामुळे आणि योग्य निर्णयामुळे सर्व प्रवासी सुरक्षित राहिले.
advertisement
BREAKING: A StarSky Fokker 50 crashed shortly after taking off from Mogadishu’s Aden Adde International Airport. Local reports say all passengers managed to evacuate safely. pic.twitter.com/WiX0TVd3Dz
— Daily365 (@onadaily365) February 10, 2026
चमत्कारच
हिंद महासागराच्या लाटांजवळ झालेल्या या अपघातानंतरही कोणतीही जीवितहानी न झाल्याने हा प्रकार चमत्कारापेक्षा कमी नाही, असे स्थानिक प्रशासनाने म्हटले आहे.
advertisement
अपघाताची माहिती मिळताच विमानतळ प्राधिकरण आणि आपत्कालीन बचाव पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. सोमाली नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाचे संचालक अहमद मुअल्लिम हसन यांनी सांगितले की, विमानातील सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले असून कोणालाही गंभीर इजा झालेली नाही. या घटनेनंतर विमान अपघाताच्या कारणांचा तपास सुरू करण्यात आला आहे.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 10, 2026 7:52 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
थरारक विमान अपघात, हवेत इंजिन बंद झालं; 50 प्रवाशांसह हिंद महासागरात क्रॅश, पंख तुटले, इंजिन पेटलं








