आधी बायकोला दिली किडनी, मग परत मागितली; विचित्र प्रकरण!
- Published by:News18 Marathi
- trending desk
Last Updated:
एका डॉक्टर पतीने पत्नीला दिलेली किडनीदेखील घटस्फोटानंतर परत मागितली होती. घटस्फोट झाल्यावर लगेचच पतीने पत्नीकडे ही मागणी केली.
नवी दिल्ली : घटस्फोटाच्या प्रकरणांमध्ये बहुतांशवेळा पत्नीकडून पतीकडे पोटगीची मागणी केली जाते. लग्नावेळी माहेरून आलेल्या वस्तू, दागिने किंवा पैसे परत मागितले जातात. काही वेळा पतीकडूनही पत्नीसाठी खर्च केलेले पैसे किंवा तिला दिलेले दागिने मागितले जातात, पण एखाद्याला दान दिलेला अवयव कसा परत मागणार? न्यूयॉर्कमध्ये तशी एक घटना काही वर्षांपूर्वी घडली होती. एका डॉक्टर पतीने पत्नीला दिलेली किडनीदेखील घटस्फोटानंतर परत मागितली होती. घटस्फोट झाल्यावर लगेचच पतीने पत्नीकडे ही मागणी केली.
घटस्फोटाच्या खटल्यांमध्ये शारीरिक छळवणूक, मानसिक त्रास, प्रेमप्रकरण, संपत्ती अशी अनेक कारणं समोर येतात. दोन्ही बाजूंकडून संपत्तीत वाटा मिळवण्याचा प्रयत्न होतो. किमान झालेली नुकसानभरपाई आर्थिक स्वरूपात मिळवण्यासाठी प्रयत्न केले जातात. न्यूयॉर्कमध्ये मात्र काही वर्षांपूर्वी घटस्फोटाची एक विचित्र केस दाखल झाली होती. 2009 साली न्यूयॉर्कमधील एका डॉक्टरने घटस्फोटानंतर पत्नीला दान दिलेली किडनीच परत मागितली होती. किडनी देणं शक्य नसेल, तर 15 लाख डॉलरची भरपाई द्यावी असं त्यानं म्हटलं होतं. डॉ. रिचर्ड बटिस्टा असं त्या डॉक्टरांचं नाव होतं. त्यांनी 2001 मध्ये त्यांची आधीची पत्नी डॉनेल बटिस्टा हिला किडनी दान केली होती. तिच्यावर किडनी प्रत्यारोपण करण्याची वेळ आली होती.
advertisement
पत्नी डॉनेल ज्या रुग्णालयात नर्सिंगचं प्रशिक्षण घेत होती, तिथं डॉ. रिचर्ड आणि तिची पहिली ओळख झाली. एनबीसी न्यूजच्या माहितीनुसार, त्या दोघांनी 1990 मध्ये लग्न केलं होतं. डॉनेल यांनी पतीकडून किडनी घेऊन प्रत्यारोपण केल्यानंतर चार वर्षांनी पतीपासून घटस्फोट मागितला. जुलै 2005 मध्ये त्यांनी घटस्फोट मागितला. हे प्रकरण खूपच वादग्रस्त ठरलं. 2009 मध्ये अनेक बातम्यांमध्ये त्यांचं प्रकरण गाजलं. कारण हे प्रकरण चार वर्ष न्यायालयात चालू होतं. नासाउ युनिव्हर्सिटी मोडिकल सेंटरचे सर्जन रिचर्ड बटिस्टा यांनी किडनी आणि 15 लाख डॉलरच्या भरपाईची मागणी सार्वजनिक करण्याचं ठरवलं होतं. निष्फळ चर्चांमुळे ते कंटाळले होते.
advertisement
डॉ. रिचर्ड यांनी असा दावा केला होता, की त्यांची पत्नी अनेक महिने त्यांना त्यांच्या तीन मुलांना भेटू देत नव्हती. त्यांनी मीडियाला सांगितलं, की ‘हा माझा शेवटचा आधार आहे. मला हे सार्वजनिक करायचं नव्हतं.’ पत्नीसोबतचा संसार टिकावा म्हणून त्यांनी पत्नीला किडनी दिली होती, असं रिचर्ड यांचं म्हणणं होतं. ‘माझं प्राधान्य तिला वाचवण्याला होतं. दुसरा फायदा आमचं लग्न टिकेल हा होता,’ असं ते म्हणाले होते. डॉक्टरांच्या माहितीनुसार, किडनी प्रत्यारोपणानंतर दीड किंवा दोन वर्षांतच डॉनेलचे दुसऱ्या पुरुषांशी संबंध जोडले गेले होते.
advertisement
घटस्फोटानंतर पत्नीपासून वेगळं झाल्यावर एखाद्या पतीने दान दिलेला अवयव मागण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असेल. विशेष म्हणजे एका डॉक्टरनंच ही मागणी केली होती.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 22, 2024 11:42 PM IST