Milk Rate: दूध उत्पादक शेतकरी होणार मालामाल! पुणे जिल्हा दूध संघाने घेतला 'हा' निर्णय
- Published by:
- local18
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
Milk Rate: पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. संघाने गाय दूध खरेदी दरात प्रति लिटर एक रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
पुणे: दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला आहे. संघाने गाय दूध खरेदी दरात प्रति लिटर एक रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. 31 जुलैच्या मध्यरात्रीपासून हा निर्णय लागू करण्यात आला असून, विक्रीदरात मात्र कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.
इंधन दरामध्ये सातत्याने झालेल्या वाढीमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूधाच्या वाहतुकीसाठी जास्त खर्च करावा लागत आहे. याशिवाय पशुखाद्याचेही भाव वाढले आहेत. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील दूध उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले होते. त्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा दूध संघाने सकारात्मक पाऊल उचलत दूध खरेदीचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
advertisement
नवीन दर काय?
दूध संघाच्या निर्णयानुसार, गायीच्या दूधाचा (3.5 फॅट आणि 8.5 एसएनएफ) खरेदी दर आता 33 रुपये प्रति लिटर झाला आहे. संस्थांसाठी वरकड खर्च धरून दूधाचा दर 33.80 प्रति लिटर इतका ठरवण्यात आला आहे. या दरवाढीमुळे संघावर थोडा आर्थिक ताण येणार असला, तरी यामुळे शेतकऱ्यांना थेट फायदा मिळणार आहे. ग्राहकांकडून मात्र जास्त पैसे घेतले जाणार नाहीत.
advertisement
दर्जेदार दूध पुरवठ्याचे आवाहन
शेतकऱ्यांनी स्वच्छ, ताजे, भेसळमुक्त आणि चांगल्या दर्जाचं दूध पुरवावे, असं आवाहन पुणे जिल्हा दूध संघाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज लिमये यांनी केलं आहे. ग्राहकांचा विश्वास टिकवण्यासाठी आणि दूधाचा दर्जा कायम राखण्यासाठी हे महत्त्वाचं असल्याचंही त्यांनी सांगितलं
दूध हा सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील अतिशय महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे दूधाला कायम मागणी असते. दूध उत्पादक शेतकरी हा दूध पुरवठा करत असतात. त्यामुळे पुणे जिल्हा दूध संघाने एकाच वेळी शेतकरी आणि ग्राहक यांच्या हिताचा निर्णय घेतला.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
August 01, 2025 12:15 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
Milk Rate: दूध उत्पादक शेतकरी होणार मालामाल! पुणे जिल्हा दूध संघाने घेतला 'हा' निर्णय