उच्च न्यायालयाचे सरकारला आदेश! 'या' शेतकऱ्यांना 3 महिन्यांच्या आत कर्जमाफी द्यावी लागणार
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Farmer Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे.
अकोला : जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. 2017 मधील छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून वंचित राहिलेल्या 248 शेतकऱ्यांना अखेर तीन महिन्यांच्या आत कर्जमाफी देण्याचा ठोस आदेश राज्य सरकारला देण्यात आला आहे. विशेष म्हणजे या शेतकऱ्यांना 2017 मध्ये अकोल्यातील एका शासकीय कार्यक्रमात तत्कालीन पालकमंत्री डॉ. रणजीत पाटल यांच्या उपस्थितीत कर्जमाफीचे प्रमाणपत्र देण्यात आले होते. हे शेतकरी अकोल्यातील तेल्हारा तालुक्यातील अडगाव बूजरूक गावचे आहेत.
advertisement
तीन महिन्यांच्या आत कर्जमाफी द्यावी लागणार
मात्र प्रमाणपत्र देऊनही प्रत्यक्षात गेल्या सात वर्षांपासून या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नव्हती. शासनाकडून वारंवार पोर्टल समस्या, तांत्रिक अडचणी अशी कारणं देण्यात आली. मात्र न्यायालयाने या कारणांचा स्वीकार न करता सरकारला सुनावणी दरम्यान चांगलीच कानउघाडणी केली. यासोबतच 22 डिसेंबरपर्यंत आदेशाची अंमलबजावणी न झाल्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर अवमान कारवाईचा इशाराही दिला आहे. त्यामुळे तीन महिन्यांच्या आत सरकारला या शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम मंजूर करावी लागणार आहे. या निर्णयामुळे अकोल्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाची लाट पसरली आहे.
advertisement
शेतकऱ्यांना भरपाई दिली जाणार
दरम्यान, राज्यातील शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळाच्या संकटाने वेढले आहे. राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की, खरीप हंगामातील पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असून मदत दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना दिली जाईल. वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भरणे यांनी स्पष्ट केले की, राज्य सरकार ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी प्रयत्नशील आहे, मात्र केंद्र व राज्य सरकारने ठरवलेल्या निकषांनुसार अहवाल तयार करावा लागेल.
advertisement
ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
गेल्या आठवडाभर महाराष्ट्रात पावसाने कहर केला आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. साताऱ्यातील माण-खटाव तालुक्यांमध्ये नदी-नाले तुडुंब भरले, पण पिके पूर्णपणे वाहून गेली. शेतकरी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करत आहेत.
advertisement
खरीप पिकांचे मोठं नुकसान
सोलापूर जिल्ह्यातील स्थितीही चिंताजनक आहे. लाखो हेक्टरवरील सोयाबीन, कांदा, उडीद, मका आदी पिकांचे नुकसान झाले. बार्शी तालुक्यात आगळगाव व उंबरगे गावात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. मराठवाड्यात हिंगोली जिल्ह्यात तब्बल पावणे तीन लाख हेक्टरवरील पिके पावसामुळे उद्ध्वस्त झाली. लातूरमध्ये शेतशिवार पाण्याखाली गेले असून, अनेक पुलांचे नुकसान झाले आहे. या परिस्थितीत शेतकरी बांधव प्रचंड चिंतेत आहेत आणि तातडीच्या मदतीची अपेक्षा करत आहेत.
advertisement
एकूणच, अकोल्यातील शेतकऱ्यांना न्यायालयाने दिलेला दिलासा हा ऐतिहासिक ठरत आहे. तर दुसरीकडे खरीप हंगामातील नुकसानीवर शासन काय उपाययोजना करते याकडे राज्यातील शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत. दिवाळीपूर्वी मदत मिळणार असल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात आशेचा किरण दिसू लागला आहे.
Location :
Akola,Maharashtra
First Published :
September 21, 2025 8:01 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
उच्च न्यायालयाचे सरकारला आदेश! 'या' शेतकऱ्यांना 3 महिन्यांच्या आत कर्जमाफी द्यावी लागणार