सोलापूरच्या शेतकऱ्याचा नादच खुळा! गाईच्या शेणापासून झाला करोडपती, नेमकं असं करतोय काय?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Success Story : मराठी माणूस व्यवसायात मागे आहे, अशी टीका अनेकदा ऐकायला मिळते. मात्र जिद्द, कल्पकता आणि मेहनत यांच्या जोरावर मराठी उद्योजकांनी वेळोवेळी ही समजूत खोटी ठरवली आहे.
मुंबई : मराठी माणूस व्यवसायात मागे आहे, अशी टीका अनेकदा ऐकायला मिळते. मात्र जिद्द, कल्पकता आणि मेहनत यांच्या जोरावर मराठी उद्योजकांनी वेळोवेळी ही समजूत खोटी ठरवली आहे. अत्यल्प भांडवलातून सुरू केलेला छोटासा उद्योगही योग्य नियोजन आणि सातत्यामुळे कोट्यवधींचा व्यवसाय बनू शकतो, हे अनेक उदाहरणांतून दिसून आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने तर पारंपरिक समजुतींनाच आव्हान देत शेणाच्या माध्यमातून कोट्यवधींची उलाढाल करणारा उद्योग उभारला असून, त्यातून उभारलेल्या भव्य बंगल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. विशेष म्हणजे या बंगल्याला त्यांनी “गोधन निवास” असे अर्थपूर्ण नाव दिले आहे.
advertisement
व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रचंड भांडवल लागतेच असे नाही, तर एक वेगळी दृष्टी आणि संधी ओळखण्याची क्षमता महत्त्वाची असते, असे अनेक यशस्वी उद्योजक सांगतात. सोलापूरच्या या शेतकऱ्यानेही हाच मंत्र आत्मसात केला. अनेकांच्या दृष्टीने टाकाऊ समजले जाणारे शेण त्याच्यासाठी उत्पन्नाचे साधन ठरले. आज शेती, ऊर्जा आणि पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये शेणाला मोठी मागणी असून, त्याचा फायदा घेत त्यांनी स्वतःचा व्यवसाय विस्तारला.
advertisement
या यशस्वी शेतकऱ्याचे नाव प्रकाश नेमाडे आहे. ते सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील इमदेवडी गावचे रहिवासी आहेत. त्यांच्याकडे वडिलोपार्जित चार एकर जमीन होती, मात्र पाण्याअभावी त्या जमिनीवर शेती करणे शक्य नव्हते. परिस्थितीसमोर हार न मानता त्यांनी पर्यायी मार्ग शोधला आणि दुग्धव्यवसायाची सुरुवात केली. सुरुवातीला त्यांच्याकडे केवळ एकच गाय होती. गावोगावी दूध विकत फिरून त्यांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. मेहनत, संयम आणि योग्य नियोजनामुळे आज त्यांच्या गोठ्यात १५० हून अधिक गायी आहेत.
advertisement
शेण विक्रीला केली सुरुवात
दुग्धव्यवसाय स्थिरावल्यानंतर प्रकाश नेमाडे यांनी आणखी एक संधी ओळखली. गायींपासून मिळणारे शेण केवळ खत म्हणूनच नव्हे, तर सेंद्रिय शेती, बायोगॅस प्रकल्प आणि पर्यावरणपूरक उपक्रमांसाठीही महत्त्वाचे ठरत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. देशभरात रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय खतांकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. तसेच बायोगॅस प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात शेणाची आवश्यकता असते. ही गरज ओळखून त्यांनी शेण विक्रीचा स्वतंत्र व्यवसाय सुरू केला.
advertisement
कोट्यवधीची उलाढाल
प्रकाश नेमाडे यांच्या गोठ्यातील गायी दूध देणं थांबल्यानंतरही त्यांची योग्य काळजी घेतली जाते. त्यामुळे शेणाचा पुरवठा सातत्याने उपलब्ध राहतो. याच शेणातून त्यांनी सेंद्रिय खताचा व्यवसाय उभारला असून, आज हा उद्योग लाखोंची नव्हे तर कोट्यवधींची उलाढाल करत आहे. एकेकाळी कोरडवाहू जमिनीवर संघर्ष करणारा शेतकरी आज त्याच जमिनीवर उभ्या राहिलेल्या कोटी रुपयांच्या व्यवसायाचा मालक आहे.
advertisement
या उपक्रमामुळे गावातील अनेक तरुणांना रोजगार मिळाला आहे. देशाच्या विविध भागांतून तरुण उद्योजक, शेतकरी आणि अभ्यासक इमदेवडी गावात येऊन या यशोगाथेचा अभ्यास करत आहेत. प्रकाश नेमाडे स्वतः वेळ काढून या तरुणांना मार्गदर्शन करतात आणि आत्मविश्वासाने उद्योग उभारण्याची प्रेरणा देतात. त्यांची कहाणी आज केवळ यशाचीच नाही, तर ग्रामीण भागातील उद्योजकतेला नवी दिशा देणारी ठरत आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 04, 2026 7:13 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
सोलापूरच्या शेतकऱ्याचा नादच खुळा! गाईच्या शेणापासून झाला करोडपती, नेमकं असं करतोय काय?











