Success Story : पारंपरिक शेतीमधून मिळतं नव्हतं उत्पन्न, नोकरी करत केली बटाटा शेती, 6 लाखांची कमाई
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prashant Pawar
Last Updated:
पारंपरिक शेतीपद्धतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने त्यांनी वेगळा विचार करत बटाटा लागवडीकडे वळण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला आहे.
बीड : बीड जिल्ह्यातील नित्रुड येथील तरुण शेतकरी रवी पवार यांनी नोकरीसोबत शेतीत नवा प्रयोग करत यश मिळवले आहे. एका नामांकित खासगी कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी करत असतानाही शेतीची आवड आणि ग्रामीण मुळांशी असलेली नाळ त्यांनी कधीच तुटू दिली नाही. पारंपरिक शेतीपद्धतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने त्यांनी वेगळा विचार करत बटाटा लागवडीकडे वळण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला आहे.
सुरुवातीला रवी पवार यांनी केवळ अर्धा एकर क्षेत्रात बटाटा लागवड करून प्रयोग सुरू केला. योग्य लागवड पद्धत, वेळेवर मशागत, संतुलित खत व्यवस्थापन आणि बाजारभावाचा अभ्यास यामुळे पहिल्याच वर्षी त्यांना समाधानकारक नफा मिळाला. या यशामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि पुढील हंगामात त्यांनी बटाटा लागवडीचे क्षेत्र एक एकरपर्यंत वाढवले. त्यानंतर सातत्याने उत्पादन आणि नफ्यात वाढ होत गेली.
advertisement
सध्या रवी पवार दीड ते दोन एकर क्षेत्रात बटाटा लागवड करीत आहेत. केवळ एकाच सीजनमध्ये ते दोन एकर क्षेत्रातून किमान पाच ते सहा लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळवत असल्याची माहिती त्यांनी दिली. खर्च वजा जाता मिळणारा हा नफा पाहता बटाटा शेती ही पारंपरिक पिकांच्या तुलनेत अधिक फायदेशीर ठरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. योग्य नियोजन आणि मेहनत असेल तर शेतीतूनही आर्थिक स्थैर्य मिळू शकते, हे त्यांनी दाखवून दिले आहे.
advertisement
यापूर्वी रवी पवार कापूस शेती करत होते. मात्र कापसाच्या लागवडीत वाढता खर्च, अनिश्चित हवामान आणि बाजारभावातील चढउतार यामुळे अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हते. त्यामुळे शेतीत काहीतरी नवीन करायचे ठरवत त्यांनी तीन वर्षांपूर्वी बटाटा शेतीची सुरुवात केली. सुरुवातीचा धोका पत्करत त्यांनी घेतलेला निर्णय आज फायदेशीर ठरत आहे.
नोकरी आणि शेती यांचा समतोल साधत रवी पवार यांनी तरुणांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. पारंपरिक पिकांना पर्याय शोधून आधुनिक आणि बाजाराभिमुख शेतीकडे वळल्यास ग्रामीण भागातही चांगले उत्पन्न मिळू शकते, असा संदेश त्यांच्या यशातून मिळतो. नित्रुड गावासह परिसरातील अनेक शेतकरी आता त्यांच्या अनुभवातून प्रेरणा घेत बटाटा लागवडीकडे वळताना दिसत आहेत.
view commentsLocation :
Bid,Maharashtra
First Published :
December 17, 2025 3:59 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
Success Story : पारंपरिक शेतीमधून मिळतं नव्हतं उत्पन्न, नोकरी करत केली बटाटा शेती, 6 लाखांची कमाई








