सीमेवर लढला आता शेतातही राबला, माजी सैनिकाने 8.50 लाखांचं काढलं उत्पन्न Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
माजी सैनिक प्रयोगशील शेतकरी धनाजी पाटील यांनी हळद आणि पपईचा अनोखा आंतरपीक प्रयोग यशस्वी केला आहे. त्यांना हळद आणि पपईतून साडेआठ लाखांचं उत्पन्न झालं आहे.
प्रीती निकम, प्रतिनिधी
सांगली : कष्टाला अनुभवाची साथ दिल्यास कमी क्षेत्रात देखील जास्तीत जास्त आर्थिक उत्पन्न घेता येऊ शकते, असा यशस्वी प्रयोग सांगलीच्या शेतकऱ्याने करून दाखविला आहे. पलूस तालुक्यातील नागठाणे गावचे माजी सैनिक प्रयोगशील शेतकरी धनाजी पाटील यांनी हळद आणि पपईचा अनोखा आंतरपीक प्रयोग यशस्वी केला आहे. त्यांना हळद आणि पपईतून साडेआठ लाखांचं उत्पन्न झालं आहे.
advertisement
माजी सैनिक धनाजी पाटील यांच्याकडे बारा एकर शेती आहे. गेल्या पाच वर्षांपासून ते हळदीचे विक्रमी उत्पादन घेतात. मागील वर्षी त्यांनी हळदीमध्ये पपईचे आंतरपीक घेतले. हळद आणि पपईच्या अंतर पिकाचा हा पहिलाच प्रयोग होता. हळद पिकाच्या अनुभवाला पपई पिकाच्या प्रयोगाची जोड देत त्यांनी आंतरपीक प्रयोग यशस्वी केला.
advertisement
पाटील यांनी 76 गुंठे क्षेत्रामध्ये बेड पद्धतीने हळदीची लागवड केली. तर आंतरपीक म्हणून 15 नंबर व्हरायटीच्या पपईची लागवड केली. ठिबकद्वारे योग्य पाणी आणि खतांच्या मात्रा दिल्या. वेळच्या वेळी योग्य खतमात्रा दिल्याने दोन्ही पिकांची वाढ जोमाने झाली.
शेतात विविध पिकांचे प्रयोग करतो. हळद हे माझे आवडीचे पीक आहे. नवीन प्रयोग म्हणून हळदीमध्ये पपईचे आंतरपीक घेतले होते. दोन्ही पिकांचे व्यवस्थापन सारखेच असल्याने दोन्ही पिके निरोगी वाढवता आली. हळदीतून दोन लाख तर पपईतून साडेसहा लाखांचा नफा मिळाला, अशी प्रतिक्रिया माजी सैनिक धनाजी पाटील यांनी लोकल 18 सोबत बोलताना दिली.
advertisement
योग्य अंतर ठेवून लागण
चार फूट अंतरावर बेड तयार केले. ठिबक अंथरूण एक आड एक सरीमध्ये संपूर्ण हळदीची लागण केली. तर उरलेल्या एक आड एक सरीमध्ये पाच फुट अंतरावरती पपईची लागवड केली. पपई रोपाच्या दोन्ही बाजूला दीड-दीड फुटाचे अंतर रिकामे ठेवले. आणि बाजूच्या एक एक फुटामध्ये हळदीची लागवड केली.
advertisement
दर्जेदार वाणांची निवड
हळद लागवडीसाठी सेलम जातीचे दर्जेदार बियाणे वापरले. तर पपई लागवडीसाठी 15 नंबर व्हरायटीची विश्वासू रोपवाटिकेतील रोपे वापरली.
भरघोस उत्पादन विक्रमी दर
सेलम जातीच्या हळदीचे 76 गुंठे क्षेत्रात 47 क्विंटल इतके उत्पादन मिळाले. तर 15 नंबर व्हरायटी पपईचे तब्बल 55 इतके भरघोस उत्पादन मिळाले. पपईला विक्रमी बाजार भाव मिळाल्याने 55 टनातून खर्च वजा जाता तब्बल साडेसहा लाखांचा नफा झाला.
advertisement
कमी शेत जमिनीमध्ये जास्तीत जास्त आर्थिक उत्पादन मिळवण्यासाठी आंतरपीक पद्धती गरजेची ठरते. आंतरपीक पद्धतीमध्ये पिके निवडताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक असल्याचे धनाजी पाटील यांनी सांगितले. काटेकोर व्यवस्थापन केल्यास हळदीमध्ये पपईचे आंतरपीक फायदेशीर ठरत असल्याचे त्यांनी सिद्ध केले आहे.
Location :
Sangli,Maharashtra
First Published :
February 12, 2025 6:00 PM IST