''काही कामाचे नाही'' म्हणून लोकांनी 'ती' रोपं फेकून दिली, साताऱ्याच्या ऋषिकेशने स्वत:च्या शेतात लावली, आता करतोय ३.५ कोटींची कमाई
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Success Story : आधुनिक तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण विचारांचा वापर करून अनेक तरुण शेतकरी शेतीतून मोठे उत्पन्न मिळवत आहेत.
मुंबई : आधुनिक तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण विचारांचा वापर करून अनेक तरुण शेतकरी शेतीतून मोठे उत्पन्न मिळवत आहेत. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या मागे धावण्याऐवजी शेतीकडे वळणाऱ्या युवकांची संख्या महाराष्ट्रात वाढताना दिसत आहे. सातारा जिल्ह्यातील एका तरुण शेतकऱ्यानेही असाच धाडसी निर्णय घेत पारंपरिक पिकांना बाजूला ठेवून कोरफड लागवडीचा मार्ग स्वीकारला आणि आज त्याच निर्णयामुळे तो कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणारा उद्योजक बनला आहे.
साताऱ्यातील ह्रषिकेश ढाणे या युवा शेतकऱ्याने कोरफड लागवड आणि त्यापासून तयार होणाऱ्या विविध उत्पादनांच्या व्यवसायातून वर्षाला तब्बल ३.५ कोटी रुपयांची उलाढाल उभी केली आहे. कोरफडीपासून तयार होणाऱ्या उत्पादनांमुळे त्याला जवळपास ३० टक्के नफा मिळत असून त्याच्या या यशामुळे अनेक शेतकऱ्यांना नवी दिशा मिळाली आहे.
पारंपरिक शेतीऐवजी कोरफड लागवडीचा निर्णय
सध्या जगभरात आयुर्वेदिक आणि नैसर्गिक उत्पादनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. त्वचा, केस आणि आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांवर कोरफड प्रभावी मानली जाते. त्यामुळे देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोरफडीच्या उत्पादनांना मोठी मागणी आहे. हीच संधी ओळखून ह्रषिकेश ढाणे यांनी आपल्या शेतात कोरफड लागवड करण्याचा निर्णय घेतला.
advertisement
सुरुवातीला हा निर्णय धाडसी वाटत असला तरी त्याने सातत्याने मेहनत घेत कोरफडीची लागवड वाढवली. आज त्याच्या शेतातून मोठ्या प्रमाणात कोरफड उत्पादन घेतले जाते. सरासरी ८ हजार लिटर कोरफड प्रक्रियेतून विविध उत्पादने तयार करून तो कोट्यवधींचा व्यवसाय करत आहे.
टाकून दिलेल्या रोपांची केली लागवड
ह्रषिकेशच्या यशामागे एक वेगळीच कथा आहे. सातारा जिल्ह्यातील पाडळी गावात काही वर्षांपूर्वी एका व्यापाऱ्याने शेतकऱ्यांना “कोरफड वाढवा, लाखो कमवा” अशी योजना सांगितली होती. त्याच्या सांगण्यावरून अनेक शेतकऱ्यांनी कोरफड लागवड केली. मात्र कापणीची वेळ जवळ येताच तो व्यापारी गायब झाला आणि शेतकऱ्यांची कोरफड विक्रीशिवाय राहिली.
advertisement
यामुळे अनेक शेतकऱ्यांनी निराश होऊन कोरफडीची रोपे टाकून दिली. पण ह्रषिकेशने याच परिस्थितीत संधी पाहिली. त्याने टाकून दिलेली रोपे गोळा करून आपल्या शेतात लावली. त्यातूनच पुढे मोठ्या व्यवसायाची सुरुवात झाली.
नोकरी सोडून सुरू केला स्वतःचा व्यवसाय
कौटुंबिक परिस्थिती साधी असल्याने ह्रषिकेशने वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी एका मार्केटिंग कंपनीत नोकरी सुरू केली होती. मात्र त्यात त्याला समाधान मिळाले नाही. त्यामुळे त्याने गावात परत येत एक लहानशी रोपवाटिका सुरू केली.
advertisement
२००७ साली गावातील शेतकऱ्यांनी टाकून दिलेली कोरफडीची रोपे त्याने गोळा करून सुमारे ४ हजार रोपे आपल्या शेतात लावली. त्यानंतर कोरफडीपासून साबण, शॅम्पू, ज्यूस आणि इतर आयुर्वेदिक उत्पादने तयार करण्याचा प्रयोग त्याने सुरू केला.
कोरफडीपासून तयार होणाऱ्या उत्पादनांचा मोठा बाजार
काही वर्षांच्या मेहनतीनंतर ह्रषिकेशने २०१३ मध्ये कोरफडीच्या उत्पादनांना व्यवसायाचे रूप देण्याचा निर्णय घेतला. त्याने स्वतःचे ब्रँडेड उत्पादने तयार करून बाजारात विक्री सुरू केली. आज त्याची उत्पादने देशातील अनेक शहरांमध्ये विकली जात आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 08, 2026 7:21 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
''काही कामाचे नाही'' म्हणून लोकांनी 'ती' रोपं फेकून दिली, साताऱ्याच्या ऋषिकेशने स्वत:च्या शेतात लावली, आता करतोय ३.५ कोटींची कमाई









