मुंबईतून केंद्रीय ऊर्जामंत्र्यांची महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा!
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
PM Kusum Yojana : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने आर्थिक प्रगती आणि पर्यावरण संरक्षण यांचा समन्वय साधत विकासाचा नवा मार्ग स्वीकारला आहे.
मुंबई : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने आर्थिक प्रगती आणि पर्यावरण संरक्षण यांचा समन्वय साधत विकासाचा नवा मार्ग स्वीकारला आहे. वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था टिकाऊ राहावी, यासाठी स्वच्छ ऊर्जा, हवामान कृती आणि हरित तंत्रज्ञानावर विशेष भर देण्यात येत आहे. या धोरणांमुळे भारत आज अक्षय ऊर्जेच्या क्षेत्रात जागतिक पातळीवर महत्त्वाचा देश म्हणून पुढे येत आहे.
अक्षय ऊर्जेत भारताची जागतिक आघाडी
गेल्या काही वर्षांत भारताने सौर, पवन आणि जैवऊर्जा क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. स्वच्छ ऊर्जेचा विस्तार केवळ पर्यावरण रक्षणापुरता मर्यादित नसून, रोजगारनिर्मिती, ऊर्जा सुरक्षितता आणि ग्रामीण विकासासाठीही महत्त्वाचा ठरत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर हवामान बदलावर ठोस कृती करणाऱ्या देशांमध्ये भारताचे नाव अग्रक्रमाने घेतले जात आहे.
महाराष्ट्राची महत्त्वपूर्ण भूमिका
या राष्ट्रीय परिवर्तनात महाराष्ट्र राज्य आघाडीवर असून, २०३० पर्यंत राज्यातील एकूण ऊर्जेमध्ये हरित ऊर्जेचा वाटा ५० टक्क्यांहून अधिक करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. स्वच्छ हायड्रोजन, इलेक्ट्रिक वाहतूक, जैव इंधन आणि शाश्वत पायाभूत सुविधा या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जात आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
advertisement
मुंबई क्लायमेट वीकचे उद्घाटन
मुंबई क्लायमेट वीक चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात हवामान बदल, शाश्वत विकास आणि लोकसहभाग यावर सविस्तर चर्चा झाली. यावेळी केंद्रीय नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, प्रोजेक्ट मुंबईचे संस्थापक शिशिर जोशी, पर्यावरण विभागाच्या सचिव जयश्री भोज, महापौर रितू तावडे, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण चे महानगर आयुक्त संजय मुखर्जी तसेच संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाचे संचालक मार्टिन कुसे उपस्थित होते.
advertisement
हवामान बदल आणि जलव्यवस्थापन
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अवकाळी पाऊस आणि बदलत्या हवामानामुळे शेतीवर गंभीर परिणाम होत असून, कापणी केलेली पिके नष्ट होण्याच्या घटना वाढत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान तर होतेच, पण सामाजिक स्थैर्यावरही परिणाम होतो. म्हणूनच हवामान बदल हा केवळ पर्यावरणीय नव्हे तर प्रशासकीय आणि आर्थिक प्रश्न बनला आहे. बदलत्या पावसाच्या पद्धती, पाण्याची टंचाई आणि किनारी भागातील धोके लक्षात घेऊन हवामान-प्रतिरोधक शेती आणि कार्यक्षम जलव्यवस्थापन धोरणांवर भर दिला जात आहे.
advertisement
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा
महाराष्ट्राने पीएम कुसुम योजना अंतर्गत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना सौर पंपांद्वारे स्वस्त आणि स्वच्छ वीज उपलब्ध होत असून, डिझेलवरील अवलंबन कमी झाले आहे. महाराष्ट्राच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी राज्यासाठी आणखी एक लाख सौर पंप मंजूर करण्याची घोषणा केली.
लोकसहभागातून हरित परिवर्तन
प्रल्हाद जोशी यांनी सांगितले की, हवामानविषयक कृती जर लोकचळवळ बनली, तर परिवर्तनाचा वेग अनेकपटीने वाढू शकतो. महाराष्ट्राने लोकसहभागातून अक्षय ऊर्जा क्षेत्रात जी प्रगती साधली आहे, ती देशासाठी मार्गदर्शक ठरेल. सरकार, उद्योग, शेतकरी आणि नागरिक यांचा समन्वय साधूनच टिकाऊ आणि हरित भविष्यासाठी ठोस पावले उचलली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 18, 2026 1:30 PM IST







