Agriculture News: पांढऱ्या सोन्यावर नवीन रोगाचा हल्ला,शेतकरी पुरते हैराण, अखेर दही आणि गुळाने केला चमत्कार
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prashant Pawar
Last Updated:
तरुण शेतकरी दयानंद नुळसावत यांनी स्वतःच्या प्रयोगातून एक प्रभावी उपाय शोधून काढला आहे. त्यांनी कापसावर मर रोगाची लागण दिसताच वेळ न घालवता पारंपरिक पद्धतीसोबत सेंद्रिय उपायांचा अवलंब केला.
बीड: बीड जिल्ह्यात यावर्षी कापसाच्या पिकावर मर रोगाने जोरदार आघात केला आहे. सतत बदलणारे हवामान, जमिनीत राहणारा अधिक ओलावा आणि वेळेवर उपाययोजना न होणे यामुळे अनेक शेतकऱ्यांचे पीक धोक्यात आले आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागांत कापसावर मर रोगाची लागण मोठ्या प्रमाणावर दिसून येत असून शेतकऱ्यांच्या चिंतेत कमालीची वाढ झाली आहे.
या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील टालेवाडी गावचे तरुण शेतकरी दयानंद नुळसावत यांनी स्वतःच्या प्रयोगातून एक प्रभावी उपाय शोधून काढला आहे. त्यांनी कापसावर मर रोगाची लागण दिसताच वेळ न घालवता पारंपरिक पद्धतीसोबत सेंद्रिय उपायांचा अवलंब केला. त्यांनी बायो संजीवनी या औषधाचा वापर करून त्यामध्ये गूळ आणि दही मिक्स केले आणि रात्रभर ते मिश्रण भिजत ठेवले. दुसऱ्या दिवशी ते पाणी झाडाच्या मुळाशी घातले.
advertisement
दयानंद नुळसावत सांगतात की, मर रोग वाढू लागला तेव्हा मी कृषी तज्ञांचा सल्ला घेतला. त्यांनी सांगितलेल्या औषधासोबत मी गूळ आणि दह्याचा वापर करून नैसर्गिकरीत्या बुरशीवर मात करण्याचा प्रयत्न केला. झाडाच्या मुळाशी हे पाणी टाकल्यानंतर काही दिवसांत झाडांमध्ये सुधारणा दिसून आली आणि रोग आटोक्यात आला. त्यांच्या या उपायामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांनाही मार्ग सापडला आहे.
advertisement
कृषी तज्ञांच्या मते मर रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी सुरुवातीपासूनच पिकाची योग्य काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. जमिनीचा निचरा नीट होणे, ओलावा नियंत्रित ठेवणे, वेळेवर शिफारशीनुसार औषध फवारणी करणे आणि सेंद्रिय घटकांचा वापर वाढवणे हे उपाय उपयुक्त ठरतात. त्याचबरोबर योग्य बीज प्रक्रिया आणि रोगप्रतिकारक जातींची निवड करणेही महत्त्वाचे आहे.
दयानंद नुळसावत यांचा हा अनुभव आजच्या तरुण शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे. संकटाच्या काळात त्यांनी केलेला प्रयोग आणि मिळवलेले यश इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरू शकते. शेतकऱ्यांनी नव्या प्रयोगांना स्वीकारत जास्तीत जास्त नैसर्गिक आणि वैज्ञानिक पद्धती वापरल्यास पीक वाचवणे शक्य आहे हे या उदाहरणातून स्पष्टपणे दिसून येते.
Location :
Bid,Maharashtra
First Published :
July 31, 2025 7:14 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
Agriculture News: पांढऱ्या सोन्यावर नवीन रोगाचा हल्ला,शेतकरी पुरते हैराण, अखेर दही आणि गुळाने केला चमत्कार