ग्रामपंचायत स्तरावर सेवा केंद्रांना मंजुरी
ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार, ग्रामपंचायत पातळीवरील “आपले सरकार सेवा केंद्र” यांना अधिकृत मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे गावपातळीवर शासनाच्या सेवांचा सहज लाभ घेता येणार आहे.
पुणे जिल्ह्यातील 1,087 ग्रामपंचायतींसाठी युजर आयडी व पासवर्ड मिळविण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत महाआयटीला प्रस्ताव पाठविण्यात आला होता. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे 1,014 ग्रामपंचायतींना युजर आयडी व पासवर्ड मिळाले आहेत.
advertisement
प्रशिक्षण व कार्यशाळा आयोजित
युजर आयडी व पासवर्ड मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत अधिकारी व केंद्रचालक यांची कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत सेवा केंद्र सुरू करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन देण्यात आले.
तसेच, प्रत्यक्ष व्यवहारात सेवा देताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन तालुका पातळीवर हँड्स-ऑन ट्रेनिंगचे आयोजन करण्यात येणार आहे. यामुळे ग्रामपंचायत अधिकारी आणि सेवा केंद्र चालकांना तांत्रिक बाबींची अधिक चांगली समज मिळेल.
ग्रामीण भागातील नागरिकांना होणारे फायदे
ग्रामपंचायत स्तरावर सेवा केंद्र सुरू झाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना एकाच ठिकाणी शासनाच्या 1,062 सेवा मिळणार आहेत. यामध्ये जन्म-मृत्यू दाखले, जात प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, 7/12 उतारा, घरकुल योजना, शिष्यवृत्ती, वीजबिल भरणा, जलजीवन मिशन यांसारख्या सेवा सहज मिळू शकतील.
दरम्यान, यामुळे ग्रामीण भागातील लोकांना वेळ, पैसा आणि श्रमांची बचत होणार आहे. तालुका किंवा जिल्हा स्तरावर जाण्याची गरज भासणार नाही. नागरिकांना त्यांच्या दारातच सेवा उपलब्ध होणार असल्याने पारदर्शकता व कार्यक्षमतेत वाढ होईल.