मुंबई : राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक सुरूच असून, 15 व 16 डिसेंबर 2025 रोजीच्या बाजारभावांमध्ये चढ-उतार पाहायला मिळाले. काही ठिकाणी चांगल्या प्रतीच्या सोयाबीनला समाधानकारक दर मिळाले असले, तरी वाढलेल्या आवकेमुळे अनेक बाजारांमध्ये दरांवर दबाव असल्याचे चित्र आहे.
आजचा बाजारभाव काय?
advertisement
16 डिसेंबर रोजी चंद्रपूर बाजार समितीत 73 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. येथे किमान दर 2,995 रुपये तर कमाल 4,370 रुपये नोंदवला गेला. सर्वसाधारण दर 3,995 रुपये राहिला. याआधी 15 डिसेंबर रोजी चंद्रपूरमध्येच कमी आवक असूनही सरासरी दर सुमारे 4,100 रुपये होता. यावरून प्रतीनुसार दरात मोठी तफावत दिसून येते.
तर 15 डिसेंबर रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये दर तुलनेने स्थिर होते. अहिल्यानगर बाजारात 20 क्विंटल आवकेसह सर्वसाधारण दर 4,450 रुपये राहिला, तर येवला बाजारात 4,327 रुपये दर नोंदवला गेला. लासलगाव आणि लासलगाव-विंचूर या कांदा बाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या केंद्रांमध्येही सोयाबीनची मोठी आवक झाली. लासलगावमध्ये 663 क्विंटल आवकेसह सरासरी दर 4,430 रुपये तर विंचूर येथे 4450 रुपये राहिला.
मराठवाडा विभागात सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. लातूर बाजारात तब्बल 10,875 क्विंटल आवक झाली असून, येथे सर्वसाधारण दर 4,400 रुपये राहिला. जालना, नांदेड, परळी-वैजनाथ, माजलगाव आणि हिंगोली या बाजारांमध्येही मोठ्या प्रमाणावर आवक नोंदवली गेली. परळी-वैजनाथमध्ये सरासरी दर 4,461 रुपये राहिला, तर माजलगावमध्ये 4,400 रुपये दर मिळाला.
वाशीममध्ये सर्वाधिक भाव
विदर्भात अमरावती, अकोला, यवतमाळ, खामगाव आणि वाशीम या बाजारांमध्ये सोयाबीनची मोठी उलाढाल झाली. अमरावती बाजारात 5,760 क्विंटल आवकेसह सरासरी दर 4,125 रुपये राहिला. अकोल्यात 3,067 क्विंटल आवक असून 4,395 रुपये दर नोंदवला गेला. विशेष बाब म्हणजे वाशीम बाजारात चांगल्या प्रतीच्या पिवळ्या सोयाबीनला कमाल 6,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत भाव मिळाला, तर सरासरी दर 5,600 रुपये राहिला. समुद्रपूर आणि मंगरुळपीर या बाजारांमध्येही 5,328 रुपयांपर्यंत उच्चांकी दर नोंदवले गेले.
