कोकणात मुसळधार पावसाचा इशारा, रायगडसाठी रेड अलर्ट
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 17 जून 2025 रोजी कोकणात पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता आहे. रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला असून, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला गेला आहे. मुंबई आणि ठाणे परिसरात आजपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावली असून, 17 जून रोजीही मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.
advertisement
उत्तर महाराष्ट्रात हलका ते मध्यम पाऊस
नाशिक जिल्हा आणि त्याचा घाटमाथा तसेच अहिल्यानगर, धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्ट्रात घाट भागात पावसाचा जोर
पुणे शहरात मध्यम पावसाची शक्यता असून, पुण्याचा घाट परिसर, सातारा आणि कोल्हापूर या भागांतील डोंगराळ भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. सोलापूर जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यात पावसाने घेतली विश्रांती
मराठवाड्यातील संभाजीनगर, बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, धाराशिव या सर्व जिल्ह्यांमध्ये सध्या पावसाचा जोर ओसरलेला आहे. काही भागांमध्ये हलक्या सरींची शक्यता असली तरी, मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने नाकारला आहे.
विदर्भात यलो अलर्ट, काही जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा
अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या सर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने यलो अलर्ट दिला आहे. बहुतेक भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. नागपूर, गडचिरोली आणि भंडारा जिल्ह्यांत काही भागांमध्ये मुसळधार पावसाचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत.