हवामान खात्याच्या माहितीनुसार, शनिवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांत सांताक्रूझनंतर रत्नागिरी येथे ३६.३ अंश, तर ब्रह्मपुरी, सोलापूर, जळगाव, अकोला आणि अमरावती येथे तापमान ३५ अंशांपेक्षा अधिक नोंदले गेले. उष्णतेची ही लाट ‘ऑक्टोबर हीट’चा परिणाम असल्याचे हवामानतज्ज्ञांनी सांगितले. राज्याच्या बहुतांश भागात वातावरण कोरडे राहिले असले तरी काही ठिकाणी तुरळक सरींची नोंद झाली आहे.
advertisement
कोणत्या जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा?
आज (रविवार, ता. १९) कोकण आणि मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून, हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे. रायगड, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि पावसाची शक्यता आहे. तर रत्नागिरी, नाशिक, सोलापूर, सांगली, धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांमध्येही तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि अनावश्यक बाहेर पडणे टाळण्याचे आवाहन केले आहे. राज्याच्या उर्वरित भागात आकाश ढगाळ राहण्याची शक्यता असून, हवामान कोरडेच राहणार आहे. मात्र, उन्हाचा चटका कायम राहील, असेही हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र
आग्नेय अरबी समुद्रात लक्षद्वीप, केरळ आणि दक्षिण कर्नाटकच्या किनाऱ्यालगत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. ही प्रणाली पुढील काही दिवसांत वायव्य दिशेने सरकताना अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर, दक्षिण अंदमान समुद्र आणि परिसरावर असलेल्या चक्राकार वाऱ्याच्या परिणामामुळे मंगळवारपर्यंत (ता. २१) आग्नेय बंगालच्या उपसागरात नव्याने कमी दाब क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. या दोन हवामान प्रणालींमुळे हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला असून, त्याचा परिणाम येत्या काही दिवसांत महाराष्ट्राच्या हवामानावर दिसू शकतो.
शेतकऱ्यांसाठी कृषी सल्ला
हवामानातील बदल आणि विजांसह पावसाच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी काढणीदरम्यान काही महत्त्वाच्या बाबींची काळजी घेणे आवश्यक आहे:
सोयाबीन पिकासाठी
शेंगा तपकिरी व कोरड्या झाल्यावरच काढणी करा. दमट हवामानात काढणी टाळा. त्यामुळे दाण्यांची बुरशी वाढू शकते. काढणी केल्यानंतर दाणे १०–१२% आर्द्रतेपर्यंत वाळवा. वाळवलेले दाणे कोरड्या, हवेशीर जागी साठवा आणि उंदीर व कीड नियंत्रणासाठी उपाय करा.
मका पिकासाठी
कणसांवरील झुबके (silks) तपकिरी व कोरडे झाल्यावर काढणी करा. पावसाच्या दिवसात काढणी टाळा, अन्यथा कणसे ओली राहून दाण्यांना बुरशी लागू शकते. वाळवणी करताना दाण्यांची आर्द्रता १२–१४% पेक्षा कमी ठेवा. साठवण स्वच्छ, कोरड्या आणि हवेशीर गोदामात करा.