पावसाची शक्यता
काल शनिवार 22 नोव्हेंबरपासून थंडी काहीशी मागे हटणार असून, हवामानात हलकी उब जाणवणारी फेज सुरू होईल. दक्षिण-पूर्वेकडून येणारे वारे आणि पूर्वेकडील कमी दाबाचा प्रभाव वाढल्याने ढगाळ वातावरण, आर्द्रतेत वाढ आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता राहील. रविवार 23 ते गुरुवार 27 नोव्हेंबरदरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
advertisement
या पावसाच्या टप्प्यामुळे हिवाळ्याला मधेच एक ब्रेक मिळणार आहे. त्यामुळे दिवसाचे तापमान 30 ते 33 अंश सेल्सियसपर्यंत वाढेल, तर किमान तापमान 16 ते 20 अंशांच्या दरम्यान राहील. मात्र ही उबदार फेज फार काळ टिकणार नाही, कारण डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात थंडीचा जबरदस्त पुनरागमन होणार आहे. हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट संकेत दिले आहेत की, मध्य डिसेंबरनंतर राज्यात थंडीच्या दोन ते तीन तीव्र लाटा येण्याची शक्यता आहे.
यावर्षी जेट स्ट्रीम अत्यंत कमकुवत असल्याने थंडीच्या लहरी अधिक दक्षिणेकडे सरकतील आणि याचे प्रत्यंतर महाराष्ट्रासह दक्षिण भारतात ठळकपणे दिसेल अशी शक्यता आहे. तसेच, काही लो-लॅटिट्यूड वेस्टर्न डिस्टर्बन्स दक्षिणेकडे येऊन राज्यावर प्रभाव टाकतील. या परिस्थितीत हिवाळ्याची तीव्रता अधिक जाणवेल.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या वर्षी हिवाळा लांब आणि अधिक तीव्र असू शकतो. जानेवारी महिन्यात विशेषतः उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात दाट धुके, कडाक्याची थंडी आणि मोठ्या प्रमाणात तापमान घट दिसू शकते. कोल्ड वेव्ह आणि सीव्हिअर कोल्ड वेव्हच्या शक्यतेमुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
कृषी क्षेत्रावर परिणाम होणार
कृषी क्षेत्रावरही या बदलाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. अचानक पावसामुळे काही ठिकाणी रब्बी पिकांच्या सिंचनावर परिणाम होऊ शकतो, तर त्यानंतर येणारी कडाक्याची थंडी काही पिकांसाठी अनुकूल आणि काहींसाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुढील हवामान अंदाजानुसार योग्य नियोजन करणे महत्त्वाचे ठरणार आहे.
एकूणच, हिवाळा अनिश्चित राहणार आहे. थंडीचा जोर वाढणार असला तरी, मधेच पावसाच्या फेऱ्या हवामानाचा समतोल बदलतील. डिसेंबर आणि जानेवारी महिन्यांत मात्र हिवाळ्याची पॉवरफुल एन्ट्री निश्चित असल्याचा हवामान तज्ज्ञांचा अंदाज आहे.
