कोकण आणि मध्य महाराष्ट्र मान्सून परिस्थिती
कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह मध्य महाराष्ट्रातील सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांत ढगाळ वातावरणासह जोरदार पावसाची शक्यता आहे. मुंबई आणि ठाणे परिसरातही मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. विशेषतः रायगड जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे नद्यांमध्ये पाणीपातळी वाढण्याची आणि शहरातील खालच्या भागांत पाणी साचण्याची शक्यता नाकारता येत नाही.
advertisement
विदर्भ आणि मराठवाडा
विदर्भातील नागपूर, अमरावती, चंद्रपूर, तर मराठवाड्यात औरंगाबाद व जालना परिसरात हलका ते मध्यम पाऊस पडेल, असा अंदाज आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हिंगोली, परभणी आणि नांदेडमध्ये येलो अलर्ट घोषित केला असून शेतकऱ्यांनी विशेष दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पश्चिम व उत्तर महाराष्ट्र
नाशिक, धुळे आणि जळगाव येथे हलका पाऊस व ढगाळ वातावरण राहील. सांगली व सोलापूरमध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे. तर सातारा, कोल्हापूर आणि पुणे घाटमाथा परिसरात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. याठिकाणीही हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे.
शेतकऱ्यांसाठी काय उपाययोजना कराव्यात?
सततच्या पावसामुळे खरीप पिकांवर तसेच भाजीपाल्यावर रोग व किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढते. यासाठी शेतकऱ्यांनी पुढील फवारण्या करणे गरजेचे आहे. जसे की,
सोयाबीन, भात आणि मका
पाने पिवळसर होणे, मुळे कुजणे किंवा पानांवर डाग पडणे यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कार्बेन्डाझिम (Carbendazim) 50% WP किंवा मॅन्कोझेब (Mancozeb) 75% WP ची फवारणी करावी. पिकांवर अळींचा प्रादुर्भाव दिसल्यास क्लोरपायरीफॉस (Chlorpyrifos) किंवा सायपरमेथ्रीन (Cypermethrin) ची फवारणी करावी.
कापूस
पिंक बॉलवर्म अथवा पाने खाणाऱ्या अळींच्या नियंत्रणासाठी इमामेक्टिन बेन्झोएट (Emamectin Benzoate) किंवा स्पिनोसेड (Spinosad) ची फवारणी करावी.बुरशीजन्य रोग टाळण्यासाठी कॅप्टान (Captan) किंवा कार्बेन्डाझिम फवारावे.
भाजीपाला पिके (टोमॅटो, मिरची, वांगी)
पाने गुंडाळणारी अळी व फळ पोखरणारी अळी यावर नियंत्रणासाठी स्पिनोसेड किंवा इंडोक्साकार्ब (Indoxacarb) ची फवारणी करावी. पानांवर डाग, करपा किंवा फळांवर डाग पडल्यास कॉपपर ऑक्सिक्लोराइड (Copper Oxychloride) किंवा झिनेब (Zineb) फवारणी करावी.
इतर पालेभाज्या
डाऊनी मिल्ड्यू व बुरशीजन्य रोग नियंत्रणासाठी मेटालेक्सिल (Metalaxyl) व मॅन्कोझेब मिश्र फवारणी प्रभावी ठरते.
