मुंबई : राज्यात दिवाळीनंतर अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली असून कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सतत सरींचा जोर कायम आहे. बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहिल्याने नागरिकांना थंड वातावरणाचा अनुभव येत असला तरी शेतकऱ्यांसाठी हा पाऊस धोकादायक ठरत आहे. कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, हिंगोली या भागांत झालेल्या मुसळधार पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आधीच सप्टेंबरमधील अतिवृष्टी आणि नंतर परतीच्या पावसाने तडाखा बसलेल्या शेतकऱ्यांना या अवकाळी सरींनी आणखी संकटात टाकले आहे.
advertisement
भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, पुढील चार दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या भागांमध्ये पावसाचा जोर कायम राहील. बहुतांश जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. नागरिकांसह शेतकऱ्यांनी पुढील काही दिवस हवामानाच्या स्थितीकडे लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
समुद्रात कमी दाबाचा पट्टा
मध्यपूर्व अरबी समुद्रावर सध्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. हे क्षेत्र पुढील तीन ते चार दिवस उत्तर दिशेकडे सरकणार असून त्यामुळे महाराष्ट्राच्या किनारपट्टीलगत आणि काही आतील भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान तज्ज्ञ मयुरेश प्रभुणे यांच्या मते, या प्रणालीमुळे कोकणापासून ते विदर्भापर्यंत पावसाचा जोर वाढणार आहे.
त्याचवेळी, आग्नेय बंगालच्या उपसागरात तयार झालेले आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र पुढील दोन दिवसांत तीव्र होत चक्रीवादळाचे रूप घेईल. हे चक्रीवादळ 27 ऑक्टोबर रोजी तयार होऊन वायव्य दिशेकडे सरकत आंध्र प्रदेश आणि ओडिशा किनारपट्टीकडे जाण्याची शक्यता आहे. या दोन हवामान प्रणालींच्या संयुक्त परिणामामुळे महाराष्ट्रातील बहुतांश भागांत मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीला हवामान स्थिर होऊन कोरडे वातावरण परत येईल, असा अंदाज वर्तवला गेला आहे.
जिल्हानिहाय अलर्ट
२६ ऑक्टोबर: मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे, नगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड आणि संपूर्ण विदर्भात ‘यलो अलर्ट’. देण्यात आला आहे.
२७ ऑक्टोबर: रायगड, पुणे, नगर, बीड, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’; उर्वरित भागांत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता.
२८ ऑक्टोबर : सिंधुदुर्ग, कोल्हापूर, नांदेड, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’; तर दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत हलका पाऊस.
तळकोकणातील स्थिती
अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रांमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सतत पावसाची रिपरिप सुरू आहे. समुद्रात वादळसदृश परिस्थिती असल्याने मच्छीमारी ठप्प झाली असून अनेक बोटी देवगड बंदरात आणि गुजरात किनाऱ्यावर आश्रयाला गेल्या आहेत. हवामान विभागाने 28 ऑक्टोबरपर्यंत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे.
शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी
सध्याच्या हवामान परिस्थितीचा विचार करता सोयाबीन, मका, भात आणि कापूस पिकांची काढणी करताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. पावसाळी वातावरणात काढणी टाळावी, शक्य असल्यास हवामान स्थिर झाल्यानंतरच कापणी करावी. काढलेले उत्पादन लगेच गोदामात किंवा ताडपत्रीखाली सुरक्षित ठिकाणी साठवावे. ओल्या शेतात थेट यंत्राद्वारे काढणी टाळावी, त्यामुळे पिकाचे नुकसान वाढू शकते. सोयाबीन आणि मक्याचे दाणे कोरडे करूनच साठवावेत, अन्यथा बुरशी निर्माण होण्याचा धोका असतो. ज्या शेतकऱ्यांनी कापणी पूर्ण केली आहे, त्यांनी उत्पादनावर ताडपत्री झाकून ठेवावे.
