राज्यभर पावसाचा जोर वाढला
कमी दाब प्रणाली मध्य भारतातून पश्चिमेकडे सरकल्याने महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाची तीव्रता वाढली आहे. लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, बीड, सोलापूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांत अतिवृष्टी झाली. चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ३४.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
कुठे कोणता अलर्ट?
रेड अलर्ट
पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक घाटमाथा आणि पुणे घाटमाथा.
advertisement
ऑरेंज अलर्ट
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा आणि छत्रपती संभाजीनगर.
येलो अलर्ट
नंदूरबार, धुळे, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, जालना, बीड, परभणी, धाराशिव, बुलडाणा, अकोला, वाशीम. सांगली, सोलापूर, हिंगोली, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली
कमी दाब क्षेत्राची स्थिती
सध्या दक्षिण अंतर्गत ओडिशामध्ये तीव्र कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. शनिवारी सकाळी ही प्रणाली गुणापूरपासून ५० किलोमीटर ईशान्येकडे, गोपालपूरपासून ७० किलोमीटर पश्चिमेकडे आणि जगदलपूरपासून २३० किलोमीटर पूर्वेकडे केंद्रित होती. या प्रणालीमुळे महाराष्ट्रासह गुजरातमध्ये पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे.
मॉन्सूनच्या परतीला विलंब
नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) राजस्थान, जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधून माघारले आहेत. तसेच गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील काही भागांतूनही परतीचा प्रवास सुरू झाला आहे. मात्र, मध्य भारतात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असल्याने मॉन्सूनचा परतीचा प्रवास महाराष्ट्रात अडखळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
पुढील आठवड्याचा अंदाज
या प्रणालीची तीव्रता हळूहळू कमी होत असली तरी गोव्यापर्यंत कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. तसेच, उत्तर अंदमान समुद्रातील वाऱ्यांच्या प्रभावामुळे १ ऑक्टोबर रोजी पुन्हा बंगालच्या उपसागरात नवे कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यातही राज्यात पावसाचा जोर कायम राहण्याची चिन्हे आहेत.
एकूणच, राज्यात पावसाचा तडाखा कायम असून, कोकण, पुणे आणि नाशिकच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा धोका आहे. नागरिकांनी हवामान विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करून आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे.