राज्यात पुन्हा वादळी पावसाची शक्यता
हवामान खात्याच्या माहितीनुसार, पूर्व विदर्भात आज मुसळधार पावसाची शक्यता असून यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर कोकणातील रायगड, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे घाटमाथा, मराठवाड्यातील जालना, परभणी, हिंगोली तसेच विदर्भातील वर्धा, नागपूर आणि भंडारा जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये वीजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस, काही ठिकाणी मुसळधार सरी आणि जोरदार वाऱ्यांची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
advertisement
कोकण व उत्तर महाराष्ट्रात सततचा पाऊस
मागील २४ तासांमध्ये कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहिला. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे राज्यातील सर्वाधिक ८० मिमी पाऊस, तर पुण्याच्या इंदापूर आणि सिंधुदुर्गच्या देवगड येथे प्रत्येकी ५० मिमी पावसाची नोंद झाली. तापमानाच्या बाबतीत, चंद्रपूर येथे राज्यातील सर्वाधिक ३३.६ अंश सेल्सियस कमाल तापमान नोंदले गेले, तर इतर भागात तापमानात चढ-उतार दिसून आले.
चक्रीवादळाचा प्रभाव अजून कायम
‘मोंथा’ चक्रीवादळाचा परिणाम अजूनही बंगालच्या उपसागर आणि पूर्व किनाऱ्यांवर दिसत आहे. त्यामुळे ओलसर वारे आणि कमी दाबाच्या पट्ट्यांचा प्रभाव महाराष्ट्रात येत आहे. हवामान तज्ञांच्या मते, पुढील ४८ तास राज्यभर अधूनमधून पावसाच्या सरी सुरू राहतील.
शेतकऱ्यांनी काय काळजी?
राज्यातील अनेक भागांत सध्या सोयाबीन, बाजरी, तूर, कापूस आणि भात यांची काढणी सुरू आहे. अशा परिस्थितीत वादळी पावसामुळे पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून खालील उपाय महत्त्वाचे ठरतात. जसे की,
१) काढणीस तयार पिके त्वरित काढून घ्या. आधीच कापलेली पिके शेतात न ठेवता सुरक्षित ठिकाणी साठवा.
२) उघड्यावर ठेवलेले धान्य, गहू, तांदूळ, भुसा यांना ताडपत्री किंवा प्लास्टिक शीटने झाकून ठेवा.
३) पाणी साचण्याची शक्यता असलेल्या शेतांमध्ये निचरा व्यवस्था ठेवावी, अन्यथा पिकांची मुळे कुजतात.
४) उभ्या पिकांवर वाऱ्याचा परिणाम होऊ नये म्हणून आवश्यक ठिकाणी आधारे बांधावेत.
