मधमाशी पालन
आजकाल सेंद्रिय शेती मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी परागीकरणाची आवश्यकता असते आणि त्या दृष्टीने मधमाश्या अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. त्यामुळे मधमाशी पालन हा शेतीपूरक आणि लाभदायी व्यवसाय मानला जातो. मधमाश्यांच्या मदतीने मिळणारे मध, मेण आणि परागकण या उत्पादने बाजारात चांगल्या किमतीत विकली जातात.
महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळ (MSKVIB) तसेच इतर प्रशिक्षण संस्था मधमाशी पालनासाठी आवश्यक प्रशिक्षण, उपकरणे आणि आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देतात. या व्यवसायासाठी जास्त जागेची किंवा भांडवलाची गरज नसते. पिकांचे उत्पादन वाढते आणि त्याचबरोबर मध विक्रीतून अतिरिक्त उत्पन्न मिळते. त्यामुळे हा व्यवसाय नवशिक्यांसाठीही उत्तम पर्याय आहे.
advertisement
पोल्ट्री फार्मिंग
कोंबडीपालन हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने किफायतशीर आणि सहज चालवता येणारा व्यवसाय आहे. पोल्ट्री फार्म सुरू करण्यासाठी शेड उभारणी, चांगल्या जातीच्या कोंबड्यांची खरेदी आणि खाद्याची व्यवस्था एवढ्यापुरतीच सुरुवातीची गुंतवणूक आवश्यक असते. सरकारकडूनही या व्यवसायासाठी कर्ज व अनुदानाच्या योजना उपलब्ध आहेत.
या व्यवसायातील खास बाब म्हणजे दर 45 दिवसांनी एक बॅच विक्रीसाठी तयार होते. म्हणजेच दीड महिन्यांत उत्पन्न मिळू लागते. अंडी आणि कोंबड्यांची बाजारात कायम मागणी असते, त्यामुळे तोट्याची शक्यता कमी राहते. अनेक शेतकऱ्यांनी कमी भांडवलात पोल्ट्री व्यवसाय सुरू करून चांगला नफा कमावला आहे. त्यामुळे कमी गुंतवणुकीतून जलद उत्पन्न देणारा हा अत्यंत फायदेशीर व्यवसाय ठरू शकतो.
मशरूम शेती
मशरूम शेती हा कमी जागेत, कमी भांडवलात सुरू करता येणारा व्यवसाय आहे. भुसा, बियाणे आणि साध्या साहित्याच्या मदतीने मशरूमची लागवड करता येते. शहरांमध्ये हॉटेल उद्योग आणि आरोग्य-जागरूक ग्राहकांमुळे मशरूमची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.
या क्षेत्रात सरकार आणि खासगी संस्थांकडून प्रशिक्षण दिले जाते. योग्य तापमान नियंत्रण आणि स्वच्छतेकडे लक्ष दिल्यास चांगले मशरूम तयार होते आणि उत्पादन कमी कालावधीत बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होते. त्यामुळे छोट्या जागेतही हा व्यवसाय फायदेशीर ठरतो.
