मुंबई : राज्यातील प्रमुख खरीप पिकांपैकी सोयाबीनच्या दरांमध्ये डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात संमिश्र चित्र पाहायला मिळत आहे. विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये झालेल्या लिलावातून सोयाबीनच्या दरात काही ठिकाणी समाधानकारक वाढ दिसत असली, तरी काही बाजारांमध्ये कमी आवक आणि दर्जातील फरकामुळे दरांवर दबाव कायम आहे. 5 आणि 6 डिसेंबर 2025 रोजी नोंदवलेल्या आकडेवारीनुसार, सोयाबीनचे सर्वसाधारण दर साधारणतः 4,200 ते 4,500 रुपये प्रतिक्विंटलच्या आसपास स्थिरावले आहेत.
advertisement
सध्याचे भाव काय?
राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या प्रमुख भागांत सोयाबीनची मोठ्या प्रमाणावर आवक सुरू आहे. जालना बाजार समितीत सर्वाधिक 5,506 क्विंटल आवक नोंदवली गेली असून येथे पिवळ्या सोयाबीनला कमाल 5,500 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. याचबरोबर खामगाव बाजारात 8,071 क्विंटल इतकी मोठी आवक असून येथे कमाल दर 5,100 रुपये तर सरासरी दर 4,525 रुपये राहिला. अकोला बाजारातही 4,121 क्विंटल आवक झाली असून सर्वसाधारण दर 4,400 रुपये नोंदवण्यात आला.
उत्तर महाराष्ट्रात दर कसे?
नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये दर तुलनेने स्थिर असल्याचे दिसून येत आहे. लासलगाव बाजारात 564 क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून येथे कमाल 4,603 रुपये आणि सरासरी 4,560 रुपये दर मिळाला. लासलगाव-विंचूर येथेही 410 क्विंटल आवक असून सरासरी दर 4,475 रुपये राहिला. येवला बाजार समितीत 95 क्विंटल आवक असून सरासरी दर 4,400 रुपये नोंदवण्यात आला. पिंपळगाव (पालखेड) येथे हायब्रीड सोयाबीनला काही ठिकाणी 4,700 रुपयांपर्यंत दर मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
विदर्भात दरात चढ उतार
विदर्भातील बाजारांमध्ये मात्र दरात चढ-उतार स्पष्टपणे जाणवत आहेत. नागपूर बाजारात 675 क्विंटल लोकल सोयाबीनची आवक असून सरासरी दर 4,125 रुपये राहिला. यवतमाळ, हिंगणघाट, वणी आणि भद्रावती या बाजारांत काही ठिकाणी दर्जा कमी असल्याने किमान दर 2,000 ते 2,800 रुपयांपर्यंत घसरलेले दिसून आले. विशेषतः भद्रावती बाजारात सरासरी दर केवळ 2,700 रुपये राहिल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
मराठवाड्यातील नांदेड, परळी-वैजनाथ, मानोरा, लोहा आणि जिंतूर या बाजारांमध्ये सोयाबीनचे दर तुलनेने समाधानकारक आहेत. नांदेड बाजारात 506 क्विंटल आवक असून सरासरी दर 4,390 रुपये, तर परळी-वैजनाथ येथे सरासरी दर 4,400 रुपये नोंदवण्यात आला. मानोरा येथे 802 क्विंटल आवक असून सरासरी दर 4,261 रुपये आहे.
एकूणच पाहता, सध्या सोयाबीनच्या बाजारात मोठ्या प्रमाणावर आवक सुरू असल्यामुळे दरांवर काही प्रमाणात दबाव आहे. मात्र ज्या बाजारात दर्जेदार आणि ओलावा कमी असलेला माल येत आहे, तेथे शेतकऱ्यांना चांगला दर मिळत आहे.
