अशा परिस्थितीत बीड जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने वेगळा मार्ग निवडत यशस्वी प्रयोग करून दाखवला आहे. केळसांगवी गावातील शेतकरी दत्तात्रय घुले यांनी पारंपारिक शेती सोडून खजूर लागवडीकडे वळण्याचा निर्णय घेतला. आज ते या पिकातून दरवर्षी लाखोंचे उत्पन्न मिळवत आहेत.
८० रोपांची लागवड
त्यांनी सुमारे दीड एकर क्षेत्रात ८० खजूराची झाडे लावली असून त्यातून दरवर्षी १० ते १२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. आष्टी तालुका हा दुष्काळग्रस्त भाग असल्याने येथे कधी अतिवृष्टी तर कधी तीव्र दुष्काळाचा सामना करावा लागतो. त्यामुळे पारंपारिक पिकांचे वारंवार नुकसान होत होते. या पार्श्वभूमीवर घुले यांनी कमी पाण्यात येणाऱ्या खजूर शेतीचा पर्याय निवडला.
advertisement
बार्ली जातीच्या खजूराची यशस्वी लागवड
घुले यांनी ‘बार्ली’ जातीच्या खजूराची लागवड केली आहे. या पिकासाठी कमी पाणी लागते आणि उत्पादनही चांगले मिळते. साधारण एका एकरात ६५ झाडे लावता येतात. प्रत्येक झाडापासून सुमारे २०० किलोपर्यंत उत्पादन मिळू शकते. यामुळे एका झाडामागे सुमारे २० हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. या खजुरांची चव गोड असून बाजारात त्यांना चांगली मागणी आहे.
अनुदानाची गरज
खजूर शेती फायदेशीर असली तरी सुरुवातीचा खर्च मोठा आहे. बार्ली जातीच्या एका रोपाची किंमत सुमारे ४,५०० रुपये असल्याने सर्व शेतकऱ्यांना हा प्रयोग करणे शक्य होत नाही.
इतर राज्यांमध्ये, विशेषतः गुजरात आणि राजस्थान येथे अशा पिकांसाठी अनुदान दिले जाते. तशाच प्रकारची मदत महाराष्ट्रातही मिळाल्यास अधिक शेतकरी खजूर, ड्रॅगन फ्रूटसारख्या नगदी पिकांकडे वळू शकतील आणि त्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल.
