शेतकऱ्यानं जगावं की मरावं
तरुण शेतकरी याने मध्यमांशी संवाद साधताना शासनाला आर्त हाक दिली आहे. तो म्हणाला की, “माझ्या शेतात संपूर्ण पाणी साचले आहे, तुम्ही मदत करा, प्रशासनाकडे लक्ष वेधून द्या” अशी विनंती करत त्याने आपल्या जगण्याच्या संघर्षाचा आवाज जनतेसमोर मांडला. “शेतकऱ्यानं जगावं की मरावं, तुम्हीच सांगा” या शब्दांत त्याने परिस्थितीची गंभीरता स्पष्ट केली.
advertisement
बीडमध्ये शेती पिकांचे मोठे नुकसान
बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील अनेक भागांत गेल्या चार दिवसांपासून अतिवृष्टी सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची खरीप पिके पाण्याखाली गेली असून सोयाबीन, कापूस, तूर यासारख्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. विशेषतः बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने शेतकऱ्यांचे नुकसान अधिक गंभीर झाले आहे.
राज्यभरातील परिस्थिती
केवळ बीडच नाही तर छत्रपती संभाजीनगर विभागातील सुमारे 800 गावे अतिवृष्टीमुळे बाधित झाली आहेत. दक्षिण गडचिरोलीमध्ये सततच्या पावसामुळे प्रशासनाने सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. विदर्भातील अकोला, चांदूररेल्वे, मेहकर आणि वाशीम या भागात पावसाचा जोर ओसरू लागला असला तरी परिस्थिती पूर्णपणे सामान्य होण्यासाठी अजून काही काळ लागणार आहे.
२ लाख हेक्टर क्षेत्र पाण्याखाली
प्राथमिक अंदाजानुसार, विदर्भातील जवळपास २ लाख हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात पाणी शेतात साचल्याने पिके उखडून जाणे, मुळांची कुज आणि रोगराई यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्येही अशाच प्रकारची परिस्थिती निर्माण झाली असून शेतकरी हवालदिल झाले आहेत.
दरम्यान, या सर्व परिस्थितीमुळे शेतकरी शासनाकडे मदतीसाठी आर्त हाक देत आहेत. नुकसानभरपाई, पीकविमा हक्काने मिळावा आणि प्रशासनाने तातडीने पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
