दराचा घसरलेला आलेख
सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी गेल्या दोन वर्षांपासून दर वाढीची प्रतीक्षा करत होते. मात्र, प्रत्यक्षात परिस्थिती उलट झाली आहे. काही शेतकऱ्यांनी दोन वर्षे घरात साठवून ठेवलेले सोयाबीन शेवटी चार हजार रुपयांपेक्षा कमी दराने विकावे लागले. एकेकाळी नऊ हजार रुपयांपर्यंत गेलेला दर आता जवळपास पाच हजार रुपयांनी कोसळला आहे. हीच स्थिती राज्यातील इतर बाजार समित्यांत दिसून येते.
advertisement
आयातीचे धोरण अडथळा
तज्ज्ञांच्या मते, सोयाबीन तेलाच्या किंमती वाढू नयेत म्हणून केंद्र सरकार वारंवार कच्च्या तेलावरील आयात शुल्क कमी करते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल आयात होते आणि देशांतर्गत उत्पादकांच्या सोयाबीनला मागणी राहत नाही. परिणामी शेतकऱ्यांना हमीभाव मिळणे तर दूरच, त्याहूनही कमी दरात विक्री करावी लागते.
उत्पादनात घट
यंदा सोलापूर जिल्ह्यात सुमारे १ लाख ३२ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. मात्र, उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषत: उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यातील सततच्या पावसामुळे पिकांना फटका बसला आहे. अनेक ठिकाणी सोयाबीनची काड गळून पडली, तर काही भागात शेंगा अपूर्ण राहिल्या.
बाजारातील मागणी घटली
सध्या बाजारात सोयाबीनला हवी तशी मागणी नाही. मागणी वाढली तरच दरात सुधारणा होऊ शकते, पण यंदा पिकाच्या गुणवत्तेत घट झाल्यामुळे खरेदीदारही सावध आहेत. त्यातच मागील महिनाभरात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी सोयाबीन पूर्णपणे खराब झाले आहे.
शेतकऱ्यांच्या मागण्या काय?
शेतकरी संघटनांनी सरकारकडे काही ठोस मागण्या केल्या आहेत. जसे की,
सोयाबीनला हमीभावाची हमी द्यावी.
आयात धोरणाचा फेरविचार करून देशांतर्गत उत्पादकांचे संरक्षण करावे.
पिकांच्या नुकसानीसाठी त्वरित आर्थिक मदत द्यावी.
सोयाबीन खरेदीसाठी सरकारी यंत्रणांनी पुढाकार घ्यावा.
शेतकऱ्यांमध्ये नाराजी
दर घसरल्याने आणि हमीभाव न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढत आहे. हमीभावाचा प्रश्न सुटल्याशिवाय सोयाबीन उत्पादकांना दिलासा मिळणार नाही, अशी स्पष्ट भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. दर घसरल्यामुळे उत्पादन खर्चसुद्धा वसूल होत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे.