सांगली: बेदाण्यासाठी सांगलीचं मार्केट प्रसिद्ध आहे. सांगली मार्केट यार्डात नवीन बेदाणा सौद्यास सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी 30 टन बेदाण्याची आवक झाली. हिरव्या बेदाण्यास प्रतिकिलो 225 तर पिवळ्या बेदाण्यास 191 रुपये दर मिळाला. बेदाण्याचे उत्पादन कमी असल्यामुळे दर तेजीत राहण्याचा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे. सांगली बाजार समितीमध्ये नूतन बेदाणा सौद्याचा प्रारंभ सभापती सुजय शिंदे यांच्या हस्ते केला. यावेळी संचालक जयाभाऊ नलवडे, शशिकांत नागे, पप्पू मजलेकर, कडप्पा वारद, सचिव महेश चव्हाण, व्यापारी उपस्थित होते.
advertisement
नवीन बेदाणा सौदा शुभारंभप्रसंगी 7 दुकानात 30 टन नवीन बेदाण्याची आवक झाली. मनेराजुरी गावचे शेतकरी प्रमोद चौगुले यांच्या हिरव्या बेदाण्यास प्रतिकिलो 225 रुपये दर मिळाला. नितीन चौगुले यांच्या हिरव्या बेदाण्यास प्रतिकिलो 221 रुपये दराने व्यापाऱ्यांनी खरेदी केला. पिवळ्या बेदाण्यास प्रतिकिलो 191 रुपये दर मिळाला आहे.
मित्राचा सल्ला ऐकला अन् उसाचा नाद सोडला, अर्ध्या एकरात शेतकरी लखपती!
बेदाण्याचे प्रतिकिलो दर
- हिरवा बेदाणा 180 ते 225 रुपये,
- मध्यम बेदाणा 130 ते 170 रुपये
- काळा बेदाणा 60 ते 100 रुपये
- पिवळा बेदाणा 180 ते 191रुपये
बेदाण्याचा चांगले दर मिळतील
"द्राक्ष छाटणी उशिरा झाली आहे. तसेच द्राक्षाचे उत्पादनही कमी आहे. यामुळे दर चांगला असणार आहे. बेदाण्याचेही दर तेजीतच असणार आहेत. शेतकऱ्यांनी सांगली बाजार समितीत जास्तीत जास्त बेदाणा विक्रीस आणावा,” असे आवाहन सांगली बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे केलेय.
चांगला भाव मिळाल्याचे समाधान
"यंदाच्या अतिवृष्टीत आणि बदलत्या वातावरणात अति कष्टाने द्राक्षबाग पिकवली. बेदाण्यास प्रतिकिलो 225 रुपये दर मिळाल्याने समाधान वाटते. शेतकरी मित्रांनी बेदाणा विक्रीस गडबड न करता सांगली मार्केट यार्डमध्ये विश्वासू व्यापाऱ्यांकडे विक्री करावं,” असं द्राक्ष उत्पादक शेतकरी प्रमोद चौगुले यांनी म्हटलंय.






