बीड: सध्याच्या काळात अनेक तरुण देखील शेती क्षेत्राकडे वळत आहेत. तसेच आधुनिक पद्धतीने शेती करून भरघोस उत्पन्न देखील घेत आहेत. बीड जिल्ह्यातील जानू नाईक तांडा येथील 20 वर्षीय तरुणाने शेतीतच करिअर करण्याचा निर्णय घेतला. वडिलार्जित एक एकर शेतीत भुईमूग लावला. योग्य नियोजनामुळे प्रविण पवार याने 3 लाखांचं उत्पन्न काढलं. युवा शेतकऱ्याचा हा प्रवास लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
advertisement
प्रवीणने सुरुवातीला अर्धा एकर क्षेत्रात भुईमूग लागवडीचा प्रयोग केला. योग्य नियोजन, मेहनत आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून त्याने पहिल्याच हंगामात समाधानकारक उत्पादन घेतले. पहिल्या प्रयोगात चांगला नफा मिळाल्याने त्याला शेतीत अधिक मेहनत घेण्याची प्रेरणा मिळाली. या यशाने आत्मविश्वास वाढल्यामुळे पुढच्या हंगामात त्याने भुईमूग लागवडीचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला.
पारंपरिक शेतीला शोधला नवा पर्याय, वर्षाला 8 लाख रुपये उत्पन्न, शेतकऱ्यानं असं काय केलं?
एक एकर शेतीतून तीन लाखांचा नफा
पहिल्या यशानंतर दुसऱ्या वर्षी प्रवीणने एक एकर क्षेत्रात भुईमूग लागवडीचा विस्तार केला. सुधारित बियाणे, ठिबक सिंचन, योग्य खत व्यवस्थापन आणि वेळेवर औषध फवारणी यामुळे उत्पादन वाढले. त्याला 50 ते 55 क्विंटल भुईमूग उत्पादन मिळाले. बाजारातील मागणी आणि योग्य विक्री व्यवस्थापन यामुळे त्याला या हंगामात तब्बल तीन लाख रुपयांपर्यंत नफा मिळाला.
आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर
प्रवीणच्या यशामागील एक महत्त्वाचा घटक म्हणजे त्याने पारंपरिक शेतीला नव्या तंत्रज्ञानाची जोड दिली. योग्य बियाण्यांची निवड, आधुनिक सिंचन पद्धती, हवामानाचा अंदाज घेत खत आणि कीटकनाशकांची योग्य प्रमाणात फवारणी यामुळे उत्पादन अधिक मिळाले. त्याने बाजारपेठेचा बारकाईने अभ्यास करून योग्य वेळी माल विक्री केली, त्यामुळे अधिक नफा मिळवणे शक्य झाले.
तरुणांसाठी उदाहरण
प्रवीण पवार याने शेतीमध्ये आधुनिक प्रयोग करून कमी क्षेत्रातूनही जास्त नफा मिळवता येतो हे दाखवून दिले आहे. शिक्षण घेत असतानाच त्याने शेतीकडे लक्ष दिले आणि यशस्वी शेती व्यवसाय निर्माण केला. आजच्या तरुणांनी शेतीमध्ये संधी ओळखून आधुनिक पद्धतींचा अवलंब केल्यास उत्तम उत्पादन आणि नफा मिळू शकतो. प्रवीणचा हा प्रवास शेतीत नव्याने येऊ इच्छिणाऱ्या तरुणांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.