सोलापूर - सध्या शेतकरी शेतात आंतरपीक घेऊन अधिकाधिक उत्पन्न मिळवत आहे. अशाच प्रकारची शेती उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबी दारफळ येथील कृषिभूषण शेतकरी नागेश अर्जुन ननवरे यांनी केले आहे. कांद्याच्या पिकात हुरड्याचं (ज्वारी) आंतरपीक घेतलं आहे. लागवडीसाठी 5 हजार रुपये पर्यंत खर्च आला असून या हुरडाच्या विक्रीतून शेतकरी ननवरे यांना आतापर्यंत एक लाखाचे उत्पन्न मिळालं आहे.
advertisement
कृषिभूषण शेतकरी नागेश अर्जुन ननवरे हे बीबीदारफळ येथे पारंपारिक पद्धतीने नैसर्गिक शेती करत आहे. गेल्या चार ते पाच वर्षापासून ते हुरड्याची विक्री करत आहेत. कांद्याची लागवड केल्यानंतर दोन ते अडीच महिन्यानंतर अडीच फुटावर चार बियाणे या पद्धतीने 35 गुंठ्यात हुरड्याची लागवड केली. ननवरे यांनी ऑक्टोबर महिन्यात टोकन पद्धतीने हुरडा लागवड केली. फुले मधुरा, कुची कुची, गूळभेंडी आणि सुरती या चार प्रकारच्या हुरड्याची लागवड त्यांनी केली.
मित्राचा सल्ला ऐकला अन् उसाचा नाद सोडला, अर्ध्या एकरात शेतकरी लखपती!
किती मिळतोय दर?
पारंपारिक पद्धतीने नैसर्गिक शेती करत असल्यामुळे जास्त खर्च नाही. ननवरे हे ज्या पद्धतीने ग्राहकांची मागणी असते त्या पद्धतीने हुरड्याची विक्री करत आहेच. या हुरड्याची कणसांसह 170 रूपये किलो दराने विक्री करत आहेत. तर विना कणसासहित 280 रूपये किलो दराने हुरड्याची विक्री केली जाते. या हुरड्याला सोलापूर जिल्ह्यासह पुणे, हैदराबाद आणि मुंबई इथून देखील मागणी असते. नैसर्गिक पद्धतीने हुरड्याची लागवड करत असल्यामुळे ग्राहकांची मागणी वाढत आहे, असे शेतकरी सांगतात.
लाखाची कमाई
या हुरडा लागवडीला ननवरे यांना 5 हजार रुपयांपर्यंत खर्च आला. तर त्याच्या विक्रीतून आतापर्यंत एक लाख रुपये पर्यंतचा उत्पन्न मिळालं आहे. आणखी हुरडा विक्री सुरू असून राहिलेल्या हुरड्यातून देखील 30 ते 40 हजार रुपयांचं उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा शेतकरी नागेश ननवरे यांनी व्यक्त केलीये. शेतकऱ्यांनी रासायनिक शेतीपेक्षा पारंपारिक पद्धतीने नैसर्गिक शेती केल्यास आणि आंतरपीक पद्धतीचा वापर केल्यास शेती नक्की परवडेल, असे कृषिभूषण ननवरे सांगतात.