व्यापारी मालामाल, शेतकरी आणि ग्राहक हैराण
घाऊक बाजारात शेतकऱ्यांकडून मिरची 50 ते 60 रुपये प्रति किलो दराने खरेदी केली जात आहे, तर तीच मिरची किरकोळ बाजारात थेट 120 रुपये किलो दराने विकली जात आहे. म्हणजेच, दुप्पट दराने विक्री होत असून, यात शेतकरी आणि ग्राहक दोघेही होरपळत आहेत. मिरचीच्या या तिखट व्यवहारात फक्त व्यापारीच मालामाल होत आहेत.
advertisement
बाजारात कमी तिखट आणि जास्त तिखट अशा दोन प्रकारच्या मिरच्या उपलब्ध असून, त्या 30 रुपये प्रति पाव किलो दराने विकल्या जात आहेत. विशेष म्हणजे, आवक वाढली असूनही दर कमी होण्याऐवजी वाढत आहेत, यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली आहे.
'उत्पादन' खर्चापेक्षा कमी दर
यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे मिरचीचे उत्पादन चांगले झाले आहे. पण जास्त पावसामुळे मिरची जास्त काळ टिकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मिळेल त्या भावात मिरची विकावी लागत आहे. मिरचीचे उत्पादन, खत, तोडणी आणि वाहतुकीचा खर्च पाहता, शेतकऱ्यांना मिळणारा दर खूप कमी आहे. त्यामुळे त्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडले आहे. एकूणच, वाढलेल्या उत्पादनामुळे मिरचीच्या दरात घसरण अपेक्षित होती, पण बाजारातील दलालांमुळे भाव वाढले असून, याचा फटका शेतकरी आणि ग्राहकांना बसत आहे.
हे ही वाचा : कृषी हवामान : पाऊस शेतकऱ्यांचे टेन्शन वाढवणार! या जिल्ह्यांना IMD चा इशारा, काय काळजी घ्याल?