मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अॅक्शन मोडवर आले आहेत. नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत त्यांनी सर्व कॅबिनेट मंत्र्यांना थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याचे आदेश दिले आहेत. उद्यापासून मंत्री राज्यातील नुकसानग्रस्त भागांचा दौरा करून प्रत्यक्ष स्थितीची पाहणी करतील.
advertisement
मुख्यमंत्र्यांनी पुढे स्पष्ट केले की, “जसे पंचनामे पूर्ण होतील तसे शेतकऱ्यांना मदत तत्काळ दिली जाईल.” यासाठी महसूल विभाग आणि मदत व पुनर्वसन यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लागली आहे.
२,२१५ कोटींचे मदत पॅकेज
अतिवृष्टीमुळे राज्यभरात पिकांचे, जमिनीचे आणि पशुधनाचे प्रचंड नुकसान झाल्याने सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कॅबिनेट बैठकीत २,२१५ कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे. ही मदत मदत व पुनर्वसन विभागामार्फत वितरित केली जाणार आहे.
सरकारच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत राज्यातील ६९ लाख हेक्टर जमीन बाधित झाली असून तब्बल ३१ लाख शेतकरी या मदतीसाठी पात्र ठरणार आहेत. ही मदत थेट बँक खात्यात जमा केली जाईल, ज्यामुळे शेतकऱ्यांना वेळेत दिलासा मिळेल.
कोणाला मिळणार मदत?
जून २०२५ ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत अतिवृष्टीमुळे ज्यांची शेती बाधित झाली आहे, त्या शेतकऱ्यांचे पंचनामे आधीच झालेले आहेत. त्याकरिता ही मदत लागू असेल.
मात्र, सध्या मराठवाड्यात सुरू असलेल्या पावसामुळे झालेले नुकसान अद्याप नोंदवले गेलेले नाही. या नुकसानीसाठी स्वतंत्र पंचनामे करून मदत जाहीर होईल.
३० जिल्हे मोठ्या प्रमाणात बाधित
प्राथमिक अहवालांनुसार, राज्यातील तब्बल ३० जिल्ह्यांतील शेतकरी बाधित झाले आहेत. मराठवाडा आणि विदर्भ विभागात तर सर्वाधिक नुकसान झाल्याचे दिसून आले आहे. अनेक ठिकाणी शेतीपिके पूर्णपणे वाहून गेली असून काही भागात जमिनी अजूनही पाण्याखाली आहेत.