बीड : सध्याच्या घडीला शेतकरी शेतीमध्ये नव नवीन प्रयोग करत आहेत. बीड येथील दयानंद पवार यांनी आपल्या एका एकर क्षेत्रामध्ये काकडीची लागवड करून त्यांनी शेतीतून चांगले उत्पन्न मिळवण्याचा आदर्श घालून दिला आहे. मागील चार वर्षांपासून त्यांनी आपल्या शेतामध्ये काकडी उत्पादनाचा प्रयोग सुरू केला आणि तो यशस्वी ठरला आहे.
दयानंद पवार यांनी 2019 मध्ये फक्त 10 गुंठे क्षेत्रामध्ये काकडी लागवड केली. हा त्यांचा पहिलाच प्रयोग होता परंतु त्यात त्यांना चांगले यश मिळाले. काकडीच्या शेतीतून त्यांनी अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळवला. या यशाने प्रेरित होऊन त्यांनी पुढच्या वर्षी लागवडीचा विस्तार केला आणि एकूण एक एकर क्षेत्रामध्ये काकडीची लागवड सुरू केली.
advertisement
दयानंद पवार आपल्या शेतामध्ये नेत्रा हे काकडी वाण वापरतात. या वाणाला चांगली बाजारपेठ तसेच त्याचा दर्जाही उच्च दर्जाचा असल्यामुळे त्याला ग्राहकांकडून नेहमी मागणी असते. नेत्रा वाणाची काकडी दिसायला आकर्षक असून चवीलाही उत्कृष्ट असते ज्यामुळे बाजारात ती सहज विकली जाते.
घे भरारी! शेतमजूर महिलेनं करून दाखवलं, महाराष्ट्रात फेमस झालाये हा ब्रँड!
दयानंद वर्षातून दोनदा काकडीची लागवड करतात. काकडीचे उत्पादन हंगामी असल्यामुळे ती बाजारात वेगाने विकली जाते आणि यामुळे अल्पावधीत त्यांना आर्थिक लाभ मिळतो. योग्य पाणी व्यवस्थापन, खतांचा समतोल वापर आणि आधुनिक शेती पद्धतींचा अवलंब यामुळे दयानंद यांना कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवता आले आहे.
दयानंद पवार यांना काकडी उत्पादनातून दरवर्षी सुमारे 3 लाख रुपयांचा नफा मिळतो. उत्पादनाचे नियोजन बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन विक्री आणि योग्य कष्ट यामुळे त्यांनी आर्थिक स्थैर्य प्राप्त केले आहे. या उत्पन्नाने त्यांनी आपल्या कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावला असून शेतीमध्ये आधुनिक उपकरणांचा वापर सुरू केला आहे.
दयानंद पवार यांची ही कहाणी इतर तरुण शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी आधुनिक शेती पद्धतींचा अवलंब करून कमी क्षेत्रातूनही चांगले उत्पन्न मिळवता येते हे दाखवून दिले आहे. पारंपरिक पद्धतींऐवजी नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेतकऱ्यांना आर्थिक प्रगतीचा मार्ग सापडू शकतो हे त्यांनी सिद्ध केले आहे.