मुंबई : देशातील सोयाबीन बाजाराबाबत महत्त्वाचा अंदाज समोर आला असून 2025-26 या हंगामात भारतातील सोयाबीन उत्पादन सुमारे 100 लाख टनांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. हे उत्पादन मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे 21 टक्के कमी आहे. उत्पादन घसरले असले तरी सोयाबीन तेलाच्या आयातीत मात्र मोठी वाढ झाली आहे. सन 2023-24 च्या तुलनेत 2024-25 मध्ये सोयाबीन तेल आयातीत तब्बल 54 टक्क्यांनी वाढ झाली आहे. देशांतर्गत उत्पादनातील चढ-उतार, पावसाचे अनियमित प्रमाण आणि जागतिक मागणी-पुरवठा परिस्थितीमुळे हा तफावत निर्माण झाल्याचे तज्ञांचे मत आहे.
advertisement
पुढे काय होणार?
अमेरिकन कृषी विभागाच्या (USDA) नोव्हेंबर 2025 मधील अहवालानुसार, जगातील एकूण सोयाबीन उत्पादन 2025-26 मध्ये 4258 लाख टनांपर्यंत पोहोचेल, परंतु हे उत्पादन मागील वर्षाच्या तुलनेत 0.3 टक्क्यांनी कमी असेल. यावरून जागतिक बाजारातही उत्पादन स्थिर असले तरी किंमतीतील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दर कसे असणार?
2025-26 हंगामासाठी केंद्र सरकारने सोयाबीनची किमान आधारभूत किंमत (MSP) 5,328 रुपये प्रति क्विंटल निश्चित केली आहे. उत्पादकांना हमीभाव मिळावा यासाठी जरी MSP निश्चित केली असली तरी बाजारातील प्रत्यक्ष व्यवहारातील दर मात्र गेल्या काही वर्षांपासून घसरणीचा कल दर्शवत आहेत. मागील तीन वर्षांत डिसेंबर महिन्यातील सरासरी सोयाबीन दर सतत खाली आले आहेत. डिसेंबर 2022 मध्ये दर 5,556 रुपये प्रति क्विंटलवर होते, तर डिसेंबर 2023 मध्ये ते 4,831 रुपये प्रति क्विंटलपर्यंत घसरले. डिसेंबर 2024 मध्ये तर दर 4,143 रुपये प्रति क्विंटलवर आले. या पार्श्वभूमीवर 2025 च्या डिसेंबरमध्ये लातूर बाजारातील सोयाबीनचे संभाव्य दर 4,515 ते 4,895 रुपये प्रति क्विंटल दरम्यान राहतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हा अंदाज FAQ ग्रेडच्या सोयाबीनसाठी आहे.
निर्यातीच्या बाबतीतही भारताला मंदीचा सामना करावा लागत आहे. सन 2023-24 मध्ये भारतातून 19.7 लाख टन सोयामीलची निर्यात झाली होती. मात्र 2024-25 मध्ये ही निर्यात कमी होऊन 18 लाख टनांवर आली आहे. जागतिक बाजारातील स्पर्धा, दरातील चढ-उतार आणि उत्पादन खर्च वाढल्यामुळे निर्यातीवर परिणाम झाल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.
बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पातील बाजार माहिती विश्लेषण व जोखीम निवारण कक्षाने नोव्हेंबर 2025 मधील परिस्थितीचा अभ्यास करून सोयाबीनच्या संभाव्य किंमतीचा सुधारित अंदाज जाहीर केला आहे. या अंदाजानुसार, आगामी काळात सोयाबीन बाजार स्थिर राहण्याची शक्यता असली तरी किंमती मोठ्या प्रमाणात वाढण्याची चिन्हे दिसत नाहीत. कमी उत्पादन, वाढती आयात आणि निर्यात घट. या तिन्ही घटकांमुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसमोर आव्हानात्मक परिस्थिती आहे.
