पीक कालावधी फक्त 60 ते 70 दिवस
झुकीनीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हा भाजीपाला फार जलद वाढतो. नर्सरीपासून काढणीपर्यंत अंदाजे दोन ते अडीच महिन्यांचा कालावधी लागतो. त्यामुळे कमी कालावधीत अनेकवेळा उत्पादन घेता येते आणि खर्चही कमी येतो.
शेती कशी करावी?
झुकीनीसाठी मध्यम ते हलक्या जमिनी योग्य मानल्या जातात. जमीन सच्छिद्र आणि पाण्याचा निचरा चांगला असावा. ऑक्टोबर ते डिसेंबर हा हंगाम झुकीनीसाठी उत्तम मानला जातो. ओळीतील अंतर 4 फूट आणि झाडांतील अंतर 2 फूट असल्यास झाडांची वाढ चांगली होते.
advertisement
ठिबक सिंचन सर्वात योग्य. नियमित पाणी दिल्यास उत्पादन जास्त मिळते.सेंद्रिय खते, जैविक कीडनाशके आणि वेळोवेळी खत व्यवस्थापन केल्यास झाडे निरोगी राहतात.
उत्पादन किती मिळते?
एका एकरातून सरासरी 10 ते 12 टन उत्पादन सहज मिळते. काही शेतकरी योग्य व्यवस्थापन केल्यास 15 टनांपर्यंत उत्पादन घेतात. झुकीनीचे काढणीचे दिवस जास्त असल्याने सतत उत्पन्न मिळत राहते.
बाजारभाव आणि नफा
सध्या झुकीनीला घाऊक बाजारात 30 ते 80 रुपये किलो दर आहे. हॉटेल्स आणि सुपर मार्केटमध्ये दर 100 ते 150 रुपये किलोपर्यंत जातो. जर एका एकरातून 10 टन उत्पादन मिळाले आणि सरासरी दर 50 रुपये किलो धरला, तर शेतकऱ्याला एकराला 5 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकते. खर्च सर्व मिळून साधारण 70 हजार ते 1 लाख येतो. म्हणजेच शेतकरी दोन महिन्यांत 4 लाखांपर्यंत निव्वळ नफा कमवू शकतो.
मार्केटिंग कसे करावे?
स्थानिक बाजारपेठेशिवाय हॉटेल्स, सुपर मार्केट, रेस्टॉरंट चेन यांना थेट पुरवठा करता येतो.
ऑर्गॅनिक झुकीनीची मागणी जास्त असल्यामुळे त्या उत्पादनाला वेगळा दर मिळतो. सोशल मीडियाचा वापर करून ग्राहकांना थेट विक्री करणे हेही फायदेशीर ठरते.
शेतकऱ्यांचा कल वाढतोय
पुणे, नाशिक परिसरातील अनेक शेतकरी झुकीनीची शेती करून उत्तम नफा मिळवत आहेत. काही शेतकऱ्यांनी केवळ दोन एकरात झुकीनी घेऊन 8 ते 10 लाख रुपयांपर्यंत कमाई केली असल्याचे उदाहरणे आहेत.
