अंड्यांच्या दरात मोठी घसरण
सध्या अंड्यांची घाऊक किंमत प्रति अंडे ७ रु वरून ४ रु पर्यंत घसरले आहेत. म्हणजेच १०० अंडी फक्त ४०० रुपयांमध्ये उपलब्ध होत आहेत. किरकोळ बाजारातही पूर्वी ८ रु ते ९ रु दराने विकली जाणारी अंडी आता ५.५० रु ते ४ रु दराने मिळत आहेत. अंड्यांचे दर घसरल्यामुळे कुक्कुटपालकांचे उत्पन्न कमी झाले असून उत्पादन खर्च भागवणेही कठीण झाला आहे.
advertisement
दर घसरण्यामागचे मुख्य कारण काय?
मध्य पूर्वेतील संघर्षामुळे सौदी अरेबिया, ओमान, कतार आणि बहरीन यांसारख्या देशांकडे होणाऱ्या निर्यातीवर मोठा परिणाम झाला आहे.
सुरक्षा कारणांमुळे आणि वाहतूक मार्गांतील अडथळ्यांमुळे हा व्यापार जवळपास ठप्प झाला आहे. युद्धाआधी भारतातून दररोज सुमारे १ कोटी अंड्यांची निर्यात आखाती देशांकडे होत होती. विशेष म्हणजे, भारतातील निर्यातक्षम अंड्यांपैकी जवळपास ८० टक्के अंडी या देशांकडेच पाठवली जातात.
निर्यात थांबल्याने मोठ्या प्रमाणात अंड्यांचा साठा देशांतर्गत बाजारात येत आहे, त्यामुळे पुरवठा वाढून दर घसरत आहेत.
ग्राहकांसाठी मोठा दिलासा
व्यापाऱ्यांसाठी ही परिस्थिती कठीण असली तरी सामान्य ग्राहकांसाठी मात्र ही दिलासादायक ठरली आहे. कमी किमतीमुळे अंड्यांची मागणी वाढली असून, अनेकांनी पुन्हा अंड्यांचा आहारात समावेश करण्यास सुरुवात केली आहे. एकूणच काय तर, महागाईच्या पार्श्वभूमीवर अंडी हा स्वस्त आणि पौष्टिक प्रथिनांचा स्रोत ठरत आहेत.
अंडी शरीरासाठी किती फायदेशीर?
अंडी हे आपल्या मानवी शरीरासाठी पोषक तत्वं असणारा महत्त्वाचा स्रोत मानला जातो. त्यामध्ये विटामिन्स A, D, E, B12, तसेच लोह आणि सेलेनियम भरपूर प्रमाणात असतात. १०० ग्रॅम अंड्यांमध्ये सुमारे १२.६ ग्रॅम प्रथिने आणि १५५ कॅलरीज असतात. त्यामुळे संतुलित आहारात अंडी महत्वाचे असतात.
परिस्थिती कधी सुधारणार?
जागतिक तणावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा थेट परिणाम भारतीय कुक्कुटपालन क्षेत्रावर होत असून, निर्यात पुन्हा सुरळीत झाल्यास बाजारातील सुधारणा होईल. असे तज्ज्ञांचे मत आहे.
