पुणे : मराठवाड्यातील एका तरुणाने महाविद्यालयात केलेल्या छोट्या प्रोजेक्टमधून तयार केलेले यंत्र आज देशभरात लोकप्रिय झाले असून त्याची थेट दखल बिल गेट्स यांनीही घेतली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चित्तेपिंपळगाव येथील योगेश गावंडे यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना तयार केलेल्या ‘फवारणी यंत्रा’ने त्यांना केवळ यशच नाही तर मोठा उद्योगही उभा करून दिला आहे. आज योगेश वर्षाकाठी तब्बल तीन कोटींची उलाढाल करतात.
advertisement
इंजिनिअरिंगच्या काळात नवनवीन प्रयोग
इंजिनिअरिंगच्या काळात योगेश सतत नवनवीन प्रयोग करीत असत. गावातील चुलतभावाला फवारणी करताना झालेली विषबाधा त्यांना प्रकर्षाने जाणवली आणि त्यातूनच शेतकऱ्यांना सोप्या पद्धतीने फवारणी करता येईल असे यंत्र बनवण्याची कल्पना सुचली. महिलांनाही वापरता येईल, पाठीवर वजन न घेता सहज ढकलत पुढे नेता येईल, अशी रचना असलेले जुगाडू फवारणी यंत्र तयार केले. हे मॉडेल त्यांनी महाविद्यालयीन स्पर्धांमध्ये ठेवताच त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला.
कॉलेजमध्ये झालं कौतुक
कॉलेजमधील कौतुकानंतर त्यांनी हे यंत्र प्रत्यक्ष विक्रीसाठी ठेवण्याचा निर्णय घेतला. सोलापूर रस्त्यावरील आडूळ गावात लोकांनी यंत्र पाहिले मात्र सुरुवातीला कोणी खरेदी करण्यास तयार नव्हते. अखेर बीडकडे जाणाऱ्या एका ग्राहकाने पहिले यंत्र घेतले. यंत्र तयार करण्यासाठी 3,800 रुपये खर्च आला होता, पण त्याची विक्री 3,200 रुपयांत करावी लागली. मात्र त्याच ग्राहकाकडून पुन्हा ऑर्डर मिळाल्यामुळे योगेशचा आत्मविश्वास वाढला आणि व्यवसायाला गती मिळाली.
योगेशच्या प्रवासात अनेक गुरूंनी मार्गदर्शन केले. मिलिंद कंद सर यांनी त्यांच्या कंपनीत त्यांना नोकरी दिली आणि प्रोडक्ट डेव्हलपमेंटवर लक्ष केंद्रित करण्यास प्रोत्साहन दिले. हाताने ढकलायच्या यंत्रात मशीनरीचा वापर करून फवारणी आणखी सोपी करण्यात आली. नंतरच्याच काळात कोळपणी व वखरणीही करता येईल अशी सुधारित यंत्रे तयार केली. एका साध्या मॉडेलपासून सुरू झालेला प्रवास पाच ते सहा विविध फंक्शन असलेल्या मॉडेलपर्यंत पोहोचला.
2019मध्ये घेतला निर्णय
जुलै 2019 पासून त्यांनी व्यावसायिक पद्धतीने उत्पादनाला सुरुवात केली. मार्च 2020 पर्यंत योगेश आणि त्यांच्या टीमने 500 पेक्षा जास्त यंत्रांची विक्री केली आणि जवळपास 21 लाखांची उलाढाल साधली. हळूहळू भारतातील उत्तर प्रदेश, ओडिशा, बिहार, झारखंड आदी राज्यांत तसेच रशिया, केनिया, नायजेरिया, मोझांबिक, जांबिया आणि न्यूझीलंडपर्यंतही या यंत्रांची निर्यात सुरू झाली.
बिल गेट्स यांना कसा भेटला?
योगेशला भारतीय युवा शक्ती ट्रस्ट आणि मॅजिक संस्थेने सुरुवातीपासून मार्गदर्शन केले. प्रोजेक्टपासून उत्पादनापर्यंतचा प्रवास सुलभ केला. नंतर सोशल अल्फाने मोठी मदत केली. याच संस्थेच्या माध्यमातून बिल अँड मिलेंडा गेट्स फाउंडेशनच्या इंडिया अॅग्रिटेक इन्क्युबेशन प्रोग्राममध्ये योगेशची निवड झाली. त्यांच्या यंत्राचा ‘वुमन फ्रेंडली’ डिझाइन पाहता त्यांना उत्तर प्रदेश, ओडिशा, बिहार व झारखंड येथे महिलांसोबत प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळाली. या राज्यांमध्ये जवळपास 400 ते 500 यंत्रांची विक्री झाली आणि त्यांच्या कामाचा प्रभाव पाहून योगेशला बिल गेट्स यांची प्रत्यक्ष भेट मिळाली. गेट्स यांनी त्यांच्या यंत्राचे आणि कल्पनेचे कौतुकही केले.
आजवर योगेशने 8 हजारांपेक्षा जास्त यंत्रांची विक्री केली असून 22 राज्यांमध्ये त्यांची उत्पादने पोहोचली आहेत. पाच ते सहा देशांत निर्यातही होते. शेतकऱ्यांच्या गरजांवर आधारित, महिलांसाठी सोपे आणि कमी खर्चात प्रभावी असे यंत्र तयार करून योगेश गावंडे यांनी मराठवाड्यातील तरुणांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे.
