मुंबई : बदलत्या काळासोबत शेतीचा चेहरामोहराच पूर्णपणे बदलत चालला आहे. केवळ परंपरागत पिकांवर अवलंबून न राहता आता शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, नियोजनबद्ध शेती आणि वेगवेगळ्या पिकांची निवड करत शेतीला उद्योगाचं स्वरूप देत आहेत. कमी क्षेत्रात अधिक उत्पादन, कमी खर्चात जास्त नफा आणि दीर्घकालीन उत्पन्नाचे स्रोत तयार करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढलेला दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजीपाला, फळबागा आणि लाकूड उत्पादन देणारी झाडे यांची मिश्र शेती लोकप्रिय होत असून साग, महोगनी, चंदन यांसारख्या वृक्ष लागवडीकडेही शेतकरी मोठ्या प्रमाणावर वळत आहेत.
advertisement
तंत्रज्ञान, ठिबक सिंचन, सुधारित रोपे आणि शास्त्रीय व्यवस्थापन यामुळे आज शेतीतून मोठं आर्थिक यश मिळवणं शक्य झालं आहे. काही शेतकरी भाजीपाला आणि फळपिकांसोबतच दीर्घकालीन उत्पन्नासाठी साग व महोगनीसारखी झाडे लावत आहेत. या झाडांना सुरुवातीच्या काळानंतर फारसा खर्च लागत नाही आणि ठरावीक कालावधीनंतर त्यांचा बाजारभाव प्रचंड वाढतो. त्यामुळे मोठ्या क्षेत्राचे मालक असलेले शेतकरी अशी लागवड करून आर्थिकदृष्ट्या भक्कम होताना दिसत आहेत.
मध्यप्रदेशमधील टिकमगढ येथील शेतकरी अनिल बडकुले यांनी 20 एकर शेतीमध्ये केलेल्या सागवान लागवडीतून तब्बल 100 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यांनी शेतजमीन केवळ पिकांसाठी वापरली नाही, तर दूरगामी विचार करत साग लागवडीचा निर्णय घेतला आणि आज त्याचा मोठा फायदा त्यांना होत आहे.
एका निर्णयाने बदललं आयुष्य
अनिल बडकुले यांनी सुमारे वीस वर्षांपूर्वी साग लागवडीची सुरुवात केली. सुरुवातीला पारंपरिक शेती करत असतानाच त्यांनी प्रयोग म्हणून काही प्रमाणात सागाची झाडे लावली. 2003 ते 2013 या कालावधीत त्यांनी टप्प्याटप्प्याने 20 एकर क्षेत्रात सुमारे 13 हजार सागाची रोपे लावली. टिकमगढ परिसरातील हवामान, जमिनीची गुणवत्ता आणि पाण्याची उपलब्धता सागासाठी अत्यंत अनुकूल ठरली. त्यामुळे झाडांची वाढ चांगली झाली आणि आज ही झाडे परिपक्वतेकडे पोहोचली आहेत.
20 एकरांतून 100 कोटीची कमाई
अनिल यांच्या मते, साग लागवडीत सुरुवातीची तीन वर्षे अत्यंत महत्त्वाची असतात. या काळात पाण्याची नियमित व्यवस्था, संरक्षण आणि निगा राखणे गरजेचे असते. एकदा झाडे स्थिरावली की खर्च अत्यंत कमी होतो. पुढील वर्षांमध्ये केवळ देखभाल आणि आवश्यक तेवढे पाणी दिले तरी झाडे उत्तम वाढतात. आता त्याच साग शेतीतून 100 कोटींचे उत्पन्न मिळवले आहे.
कल्पना कशी सुचली?
याबाबत अनिल बडकुले सांगतात की, शेतीतून कायमस्वरूपी व सुरक्षित नफा मिळावा, हा त्यांचा मुख्य उद्देश होता. सुमारे तीस वर्षांच्या शेती अनुभवातून त्यांना हे जाणवलं की फक्त हंगामी पिकांवर अवलंबून राहणं धोक्याचं असू शकतं. नफा मिळवत असतानाच पर्यावरणाचा समतोल राखला गेला पाहिजे, या विचारातून त्यांनी झाडांची लागवड निवडली. सुरुवातीला त्यांनी चंदन झाडांचा प्रयोग केला, मात्र तो आर्थिकदृष्ट्या परवडणारा ठरला नाही. त्यानंतर त्यांनी साग लागवडीकडे मोर्चा वळवला आणि तो निर्णय आज त्यांच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरला आहे.
