फार्मर आयडी असलेल्यांना आपोआप रक्कम मिळणार
महसूल विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी (शेतकरी ओळख क्रमांक) आहे, त्यांना कोणतीही अतिरिक्त प्रक्रिया न करता त्यांच्या बँक खात्यावर मदतीची रक्कम आपोआप जमा होईल. शेतकऱ्यांना केवळ प्रतीक्षा करावी लागेल. शासनाच्या आर्थिक व्यवहारानंतर बँका संबंधित खात्यावर रक्कम जमा झाल्याचा मेसेज देणार आहेत. त्यामुळे निधी मंजूर झाल्यानंतर आणि प्रत्यक्ष पैसे खात्यात जमा होईपर्यंत काही दिवसांचा कालावधी लागू शकतो.
advertisement
फार्मर आयडी नसलेल्यांसाठी केवायसी आवश्यक
ज्या शेतकऱ्यांकडे अजून फार्मर आयडी नाही, त्यांच्यासाठी शासनाने विशिष्ट (VK) क्रमांक तयार केले आहेत. या क्रमांकाच्या आधारे शेतकऱ्यांनी जवळच्या ‘महा ई सेवा केंद्रा’त जाऊन केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. केवायसी पूर्ण झाल्यानंतरच मंजूर झालेली रक्कम त्यांच्या खात्यावर जमा केली जाईल.
गावोगावी शेतकऱ्यांमध्ये संभ्रम
दरम्यान, गावोगावी शेतकऱ्यांमध्ये “फार्मर आयडी काढला का?”, “केवायसी पूर्ण केली का?” अशा चर्चांना उधाण आले आहे. काही शेतकऱ्यांनी सांगितले की त्यांनी फार्मर आयडी आणि केवायसी दोन्ही प्रक्रिया पूर्ण केल्या असूनही त्यांच्या खात्यात अद्याप पैसे जमा झालेले नाहीत. महसूल विभागाचे अधिकारी मात्र सांगत आहेत की शासनाकडून निधी टप्प्याटप्प्याने पाठवला जातो आणि सर्व पात्र शेतकऱ्यांना लवकरच रक्कम मिळेल.
टप्प्याटप्प्याने निधी वाटप सुरू
राज्य शासनाकडून प्रत्येक जिल्ह्यातील मंजूर यादीनुसार निधी पाठवला जात आहे. मंजूर रक्कम असलेल्या पण आयडी किंवा केवायसी अपूर्ण असलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्याने ती प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आतापर्यंत सोलापूर जिल्ह्यातील १.२२ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात १४० कोटी ७९ लाख रुपये जमा झाले असून, उर्वरित ७.६४ लाख शेतकऱ्यांना लवकरच लाभ मिळणार आहे.
