मृत्यू, जखमी आणि अपंगत्वासाठी मदत
या जीआरनुसार, अतिवृष्टी किंवा पुरामुळे मृत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना ४ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. तर अपंगत्व आलेल्या नागरिकांना ७४,००० ते २.५ लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य मिळेल. जखमी झालेल्या व्यक्तींना वैद्यकीय उपचारासाठी वेगवेगळ्या स्तरावर भरपाई दिली जाणार आहे.
शेती आणि पिकांच्या नुकसानीसाठी मदत
advertisement
शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीसाठी सरकारने वेगवेगळ्या प्रमाणात आर्थिक दर निश्चित केले आहेत. पिकांच्या नुकसानीसाठी प्रति हेक्टर १८,५०० ते ३२,५०० रुपये मदत मिळेल. जमीन वाहून गेल्यास प्रति हेक्टर ४७,००० रुपये दिले जातील. तसेच, गोठे, झोपड्या, मत्स्य व्यवसाय आणि शेतीसंबंधित रचना नुकसानीसाठीही वेगवेगळ्या स्तरावर भरपाई दिली जाणार आहे.
जनावरांच्या नुकसानीसाठी मदत
पुरामुळे जनावरांचे मोठे नुकसान झाल्याने सरकारने त्यासाठीही भरपाईचे दर निश्चित केले आहेत. दुधाळ जनावरासाठी ३७,५०० रुपये ओढकाम जनावरासाठी ३२,००० रुपये, लहान जनावरासाठी २०,००० रुपये, शेळी किंवा मेंढीसाठी ४,००० रुपये,
आणि प्रत्येक कोंबडीसाठी १०० रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांसाठी थेट आर्थिक मदत आणि सवलती
शेतकऱ्यांना रब्बी हंगामात खत आणि बियाणे खरेदीसाठी प्रति हेक्टर १०,००० रुपये (जास्तीत जास्त ३ हेक्टरपर्यंत) थेट बँक खात्यात जमा केले जातील. तसेच, मनरेगा योजनेअंतर्गत शेती पुन्हा लागवडीस योग्य करण्यासाठी प्रति हेक्टर ३ लाख रुपयांपर्यंत मदत देण्यात येईल.
शासनाने शेतकरी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी अनेक सवलतींची घोषणाही केली आहे. जसे की, जमीन महसुलात सूट, कर्ज पुनर्गठन आणि एक वर्षाची वसुली स्थगिती, वीज बिल माफी, दहावी-बारावी विद्यार्थ्यांची फी माफी, आणि परीक्षा शुल्क माफी.
पायाभूत सुविधा दुरुस्तीला १० हजार कोटींचा निधी
पुरामुळे बाधित भागातील रस्ते, पूल, जलसंपदा रचना आणि वीज सुविधांचे मोठे नुकसान झाल्याने राज्य सरकारने १० हजार कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर केला आहे. हा निधी ग्रामविकास, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा आणि ऊर्जा विभागांमार्फत खर्च केला जाणार आहे.