एकरी खर्च किती येतो?
जमिनीची खोल नांगरणी, सेंद्रिय खतांचा वापर, प्लास्टिक मल्चिंग आणि ड्रिप सिंचनाचा योग्य वापर केल्यास एकरी 80 ते 100 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळू शकते, तर उत्तम व्यवस्थापनाने 110 ते 125 क्विंटलचे उत्पन्नही मिळते. हिवाळी हंगामात लागवड केल्यापासून फलधारणा होईपर्यंत साधारण 80 ते 90 दिवसांचा काळ लागतो. या पिकासाठी एकरी खर्चात रोपांसाठी 5 हजार ते 10 हजार, मल्चिंग व बेड तयार करण्यासाठी 10 ते 12 हजार, खत व औषधे 8 ते 10 हजार आणि सिंचन व मजुरी 8 ते 10 हजार रुपये येतात. याप्रमाणे एकरी एकूण खर्च सुमारे 35 ते 50 हजार रुपये होतो.
advertisement
नफा किती मिळतो?
याउलट बाजारात कलिंगडाला हिवाळ्यात 25 ते 35 रुपये प्रतिकिलो दर मिळतो आणि काही आठवड्यांत 40 रुपये प्रतिकिलोपर्यंतही पोहोचतो. सरासरी 90 क्विंटल म्हणजेच 9 हजार किलो उत्पादन आणि 30 रुपये सरासरी दर गृहित धरल्यास शेतकऱ्यांना एकरी 2 लाख ७० हजार रुपये मिळतात. खर्च वगळल्यानंतर निव्वळ नफा 2 लाख 30 हजारांपर्यंत पोहोचतो. जर उत्पादन 100 क्विंटल आणि दर 35 ते 40 रुपये मिळाला तर हा नफा 3 ते 3.5 लाखांपर्यंतही जाऊ शकतो. त्यामुळे अनेक तरुण शेतकरी भाजीपाला किंवा पारंपारिक पिकांऐवजी हिवाळी कलिंगड शेतीकडे वळताना दिसत आहेत.
सुधारित वाण जसे की सुगर बेबी, अरुण, के-388, ब्लॅक डायमंड इ. बाजारात चांगले भाव मिळवून देतात. याशिवाय, प्लास्टिक मल्चिंगचा वापर केल्यास जमिनीतील ओलावा टिकून राहतो, तणाचा प्रादुर्भाव कमी होतो आणि फळांची वाढ वेगाने होते. ड्रिप सिंचनामुळे पाण्याची ४० टक्क्यांपर्यंत बचत होऊन गुणवत्ता वाढते. तसेच, जैविक कीडनियंत्रण आणि वेळेवर फवारणी केल्यास रोगांचा धोका कमी होतो आणि उत्पादनावर परिणाम होत नाही.
बर्याच ठिकाणी कलिंगडाला थेट बाजारपेठेतील घाऊक व्यापारी आणि फळ विक्रेते शेतातूनच खरेदी करण्यास प्राधान्य देतात, त्यामुळे वाहतूक व बाजार शुल्काचा खर्च वाचून शेतकऱ्यांना अधिक फायदा मिळतो.
