मुंबई : आज शेतीत पारंपरिक पिकांबरोबरच बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन आधुनिक आणि लाभदायक पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. अशाच पिकांपैकी एक म्हणजे बेबी कॉर्न. कमी कालावधीत तयार होणारे, खर्चाच्या तुलनेत अधिक उत्पन्न देणारे आणि कायम मागणी असलेले पीक म्हणून बेबी कॉर्नची ओळख तयार झाली आहे. योग्य नियोजन, तंत्रज्ञान आणि बाजारपेठेची जोड मिळाल्यास बेबी कॉर्नच्या शेतीतून शेतकरी लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवू शकतात.
advertisement
बेबी कॉर्न म्हणजे मका पिकाचा अगदी लवकर काढलेला, कोवळ्या अवस्थेतील कणसाचा प्रकार. हे प्रामुख्याने हॉटेल, रेस्टॉरंट, चायनीज खाद्यपदार्थ, स्टार हॉटेल्स, तसेच प्रक्रिया उद्योगांत मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. शहरी भागात आणि पर्यटनस्थळांवर याची मागणी नेहमीच जास्त असते. त्यामुळे बेबी कॉर्नला बाजारात चांगला आणि स्थिर भाव मिळतो.
बेबी कॉर्नचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे पीक केवळ 55 ते 65 दिवसांत काढणीस तयार होते. त्यामुळे वर्षातून 4 ते 5 पिके घेता येतात. हे पीक खरीप, रब्बी आणि उन्हाळी अशा तिन्ही हंगामांत घेता येते. काळी, मध्यम किंवा चांगल्या निचऱ्याची जमीन या पिकासाठी योग्य ठरते. पाण्याचा निचरा महत्त्वाचा असल्याने पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी लागते.
एकरी खर्च किती येतो?
बेबी कॉर्न शेतीसाठी लागणारा एकरी खर्च साधारण 30 हजार ते 40 हजार रुपयांच्या दरम्यान येतो. यामध्ये बियाणे, मशागत, खत, कीडनाशके, मजुरी आणि पाणी व्यवस्थापन यांचा समावेश असतो. सुधारित आणि हायब्रिड वाण वापरल्यास उत्पादन आणि दर्जा दोन्ही चांगले मिळतात.
उत्पन्न आणि नफा किती?
एका एकरातून सरासरी 2.5 ते 3 टन बेबी कॉर्न उत्पादन मिळू शकते. बाजारात बेबी कॉर्नला दर्जानुसार किलोमागे 40 ते 80 रुपये दर मिळतो. यानुसार एका पिकातून 1.2 ते 2 लाख रुपये उत्पन्न सहज मिळू शकते. खर्च वजा जाता एका हंगामात 70 हजार ते 1.5 लाख रुपयांपर्यंत निव्वळ नफा मिळण्याची शक्यता असते. वर्षातून 3 ते 4 पिके घेतल्यास हा नफा सहजपणे 4 ते 6 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकतो.
दुहेरी फायदा
यासोबतच बेबी कॉर्नच्या झाडांपासून चाऱ्याचेही उत्पन्न मिळते. कणसे काढल्यानंतर उरलेले पीक हिरव्या चाऱ्यासाठी वापरता येते. ज्यामुळे पशुपालक शेतकऱ्यांचा अतिरिक्त खर्चही वाचतो.
