७/१२ उतारा आणि फेरफार दस्तऐवज तपासा
७/१२ उतारा (Satbara Utara) म्हणजे गाव नमुना क्र. ७ आणि १२ मधील जमिनीची संपूर्ण माहिती असलेला अधिकृत दस्तऐवज. महसूल खात्याच्या https://mahabhulekh.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन मूळ उतारा पाहावा. त्यात मालकाचे नाव, जमीन क्षेत्रफळ, फेरफार क्रमांक आणि शेवटचा फेरफार कधी झाला हे तपासणे गरजेचे आहे. बनावट उताऱ्यांमध्ये अनेकदा मालकाचे नाव किंवा फेरफार क्रमांक चुकीचा असतो.
advertisement
ई-चावडी (E-Chawadi) नोंदीची पडताळणी करा
चावडीवरील नोंदी अधिकृत असतात. या नोंदीत कोणताही बदल किंवा संशयास्पद फेरफार आहे का ते तपासा.
मालकी हक्कामध्ये अचानक बदल झाला आहे का?
फेरफार नोंदणी क्रमांक आणि तारीख जुळतात का, अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी व शिक्के स्पष्ट आणि मूळ स्वरूपात आहेत का? ही सर्व माहिती तपासल्यास फसवणुकीची शक्यता कमी होते.
सही आणि शिक्के ओळखा
खऱ्या कागदपत्रांमध्ये स्वाक्षरी नेहमी एकसंध असते आणि शिक्का स्पष्ट दिसतो. जिल्हाधिकारी, तहसीलदार किंवा सब-रजिस्ट्रार यांच्या अधिकृत शिक्क्यावर “Government of Maharashtra” असा ठसा असतो. बनावट कागदपत्रांमध्ये अक्षरांचा आकार वेगळा असतो, फॉन्ट विसंगत असतो आणि मजकूरात शुद्धलेखनाच्या चुका आढळतात.
स्टॅम्प पेपरची सत्यता तपासा
स्टॅम्प पेपरवरील मुद्रांक क्रमांक https://www.shcilestamp.com
या वेबसाइटवर तपासता येतो. खऱ्या स्टॅम्प पेपरवर नक्षी ठळक आणि स्पष्ट असते, तर बनावट पेपरवर ती फिकी किंवा धूसर दिसते. स्टॅम्प पेपरवरील दिनांक आणि विक्रेत्याचे नाव अधिकृत नोंदीशी जुळते का तेही बघा.
एनए (NA) प्रमाणपत्र आणि ले-आउट मंजुरी तपासा
जमीन नॉन-अॅग्रिकल्चरल (NA) आहे का हे तपासा. ग्रामपंचायत, नगरपरिषद किंवा महानगरपालिकेची मंजुरी नसल्यास ती जमीन विक्रीसाठी योग्य नसते. ले-आउट मंजुरीची कागदपत्रे संबंधित प्राधिकरणाकडून पडताळून घ्या.
इन्कंब्रेन्स सर्टिफिकेट
हे प्रमाणपत्र महसूल विभागाकडून मिळते आणि त्यात जमिनीचा मालक, कर्जाची स्थिती आणि कोणतेही प्रलंबित वाद आहेत का याची माहिती असते. अनुभवी वकिलाकडून सर्व कागदपत्रांची तपासणी करून घेणे अधिक सुरक्षित ठरते.
व्यवहार करताना घाई करू नका
जर विक्रेता अत्यंत कमी दरात जमीन विकण्याची घाई करत असेल किंवा डिजिटल स्वरूपातील कागदपत्रे दाखवण्यास नकार देत असेल, तर सावध राहा. रजिस्ट्रार कार्यालयात जाऊन मूळ कागदपत्रांची प्रत्यक्ष पडताळणी करणे हेच सर्वात सुरक्षित पाऊल आहे.
