खाते वाटप म्हणजे काय?
जर एका ७/१२ उताऱ्यावर भावंडे किंवा वारसांची एकत्रित नावे असतील, तर त्यातील प्रत्येकाचा हक्क कायदेशीरपणे विभाजित करून त्यांचे स्वतंत्र वाटे दाखवणे म्हणजे खाते वाटप. खाते वाटप पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या नावाचा नवीन सातबारा मिळतो. यामुळे जमीन ताबा, शेती, कर्ज तसेच सरकारी योजनांचा लाभ मिळवताना अडथळे राहत नाहीत.
advertisement
खाते वाटपाची प्रक्रिया कशी होते?
खाते वाटपाची प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी सर्व खातेदारांची संमती अत्यावश्यक असते. आपापसातील तोंडी कराराऐवजी लेखी अर्ज तयार करणे आवश्यक आहे. तहसीलदारांकडे प्रस्ताव सादर करावा लागतो.
आवश्यक कागदपत्रे कोणती?
सर्व खातेदारांची पूर्ण नावे
जमिनीचा गट क्रमांक, क्षेत्रफळ, गाव व तालुका
७/१२ आणि ८-अ उतारे
वारस नोंद असेल तर वारस प्रमाणपत्र
ओळखपत्रे (आधार, पॅन इ.)
खातेदारांची संमतीपत्रे
आवश्यक असल्यास गाव नकाशा (गाव नमुना २)
अर्ज दिल्यानंतर तलाठी प्रत्यक्ष पाहणी करतो. त्यानंतर मंडळ अधिकारी आणि तलाठी मिळून पंचनामा करतात आणि जमीन वाटणी योग्य आहे का ते तपासतात. पंचनाम्यावर आधारित अहवाल तहसील कार्यालयात पाठवला जातो. तहसीलदार सर्व कागदपत्रे तपासून, खातेदारांच्या संमतीनुसार खाते वाटपाचा आदेश देतो. त्यानंतर महसूल विभाग नवीन स्वतंत्र ७/१२ उतारे तयार करून संबंधित खातेदारांना उपलब्ध करून देतो.
खाते वाटपात वाद असल्यास काय करावे?
कुटुंबातील सदस्यांमध्ये हिस्स्यावर मतभेद असल्यास तहसीलदार खाते वाटपाचा आदेश देत नाही. अशा वेळी सिव्हिल कोर्टात दावा दाखल करावा लागतो. न्यायालय जमीन कितीप्रमाणात कोणाला द्यायची ते ठरवते आणि त्या आदेशानुसार वाटप केले जाते.
कोणत्याही खातेदाराला वाटपाबाबत हरकत असल्यास तो ७/१२ वर ‘हरकतदार’ म्हणून नाव नोंदवू शकतो. त्यानंतर तहसीलदार सुनावणी घेऊन निर्णय घेतो किंवा वाद न्यायालयाकडे पाठवतो.
ऑनलाइन खाते वाटपासाठी अर्ज कसा करायचा?
महाराष्ट्र शासनाने खाते वाटप प्रक्रिया ऑनलाइन केली आहे. अर्जदाराने https://aaplesarkar.mahaonline.gov.in या पोर्टलवर लॉगिन करावे. त्यानंतर "Revenue Department" हा पर्याय निवडावा. त्यानंतर "Partition of Land" हा पर्याय निवडून संपूर्ण अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.
