हंगाम कधी सुरू होतो?
ऑक्टोबर ते जानेवारी हा हंगाम पेरू लागवडीसाठी उत्तम मानला जातो. एकदाच केलेली लागवड 12 ते 15 वर्षे सतत उत्पादन देऊ शकते, हीच या पिकाची मोठी आर्थिक जमेची बाजू आहे. पेरू झाडाला खूप पाण्याची किंवा रासायनिक खतांची आवश्यकता नसते. त्यामुळे कमी जोखमीचे पीक म्हणून शेतकरी पेरूची लागवड निवडत आहेत. सेंद्रिय पद्धतीने पिकवल्यास ग्राहकांकडून अधिक विश्वास आणि प्रीमियम दर मिळतो.
advertisement
एकरी खर्च किती येतो?
एकरी पेरू लागवड करण्यासाठी साधारण 60 हजार ते 90 हजार रुपये खर्च येतो. यामध्ये रोपे, ड्रिप सिंचन, सेंद्रिय खते, मजुरी आणि व्यवस्थापनाचा खर्च समाविष्ट असतो. पेरूच्या एका एकरात साधारण 150 ते 180 झाडे लावली जातात. झाड तिसऱ्या वर्षापासून व्यावसायिक उत्पादन देण्यास सुरुवात करते. योग्य व्यवस्थापन केल्यास एक एकरातून 10 ते 14 टन उत्पादन मिळू शकते आणि बाजारात दर 25 ते 60 रुपये किलोपर्यंत मिळाल्यास एकरी 2.5 लाख ते 7 लाख रुपये उत्पन्न मिळते. सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेतल्यास दर 80 ते 110 रुपये किलोपर्यंत मिळू शकतात. खर्च वजा केल्यानंतर शेतकऱ्याला एकरी 1.7 लाख ते 6 लाख रुपये शुद्ध नफा मिळू शकतो. अनेक शेतकरी थेट ग्राहकांना विक्री करून नफ्यात वाढ करत आहेत.
नियोजन कसं करावं?
ड्रिप सिंचन, योग्य छाटणी आणि फळांची ग्रेडिंग लक्षात घेणे आवश्यक आहे. नीमास्त्र, ब्रह्मास्त्र, जीवामृत यांचा वापर केला तर रोगराई नियंत्रित राहते आणि फळांची गुणवत्ता वाढते. फळांची पॅकिंग, ब्रँडिंग आणि थेट ग्राहक विक्री केल्यास नफा अधिक वाढतो.
दरम्यान, हिवाळ्यात पेरू लागवड शेतकऱ्यांसाठी निश्चितच आर्थिक स्थैर्याचे दार ठरू शकते. योग्य नियोजन आणि बाजारपेठ उपलब्धता असेल तर पेरू शेती शेतकऱ्यांना दरवर्षी लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवून देऊ शकते.
