शेळीपालनाचे फायदे
शेळीपालनात इतर पशुपालन व्यवसायांच्या तुलनेत प्रारंभिक गुंतवणूक कमी लागते. कमी चारा, मर्यादित जागा आणि थोड्या श्रमांत हा व्यवसाय चालवता येतो. शिवाय, शेळीचे दूध पोषक तत्त्वांनी भरलेले असून औषधीदृष्ट्याही उपयुक्त आहे. त्यामुळे याच्या विक्रीला चांगला प्रतिसाद मिळतो. काही शेळी जाती मांस आणि दूध दोन्ही उत्पादन देतात, ज्यामुळे शेतकऱ्यांना वर्षभर स्थिर उत्पन्न मिळते.
advertisement
प्रमुख शेळी जाती आणि त्यांचे फायदे
सिरोही जात
राजस्थानच्या वाळवंटी प्रदेशातून उत्पन्न झालेली सिरोही जात देशभर लोकप्रिय आहे. सरासरी ४० ते ५० किलो वजन असणारी ही शेळी मांस उत्पादनासाठी सर्वोत्तम मानली जाते. राजस्थान, हरियाणा, गुजरात आणि मध्य भारतातील उष्ण हवामानात ती सहज तग धरते. तिचे मांस चविष्ट आणि बाजारात जास्त दराने विकले जाते.
जमुनापरी जात
उत्तर प्रदेशात आढळणारी जमुनापरी शेळी तिच्या भव्य शरीरयष्टी आणि उच्च दुग्धउत्पादनामुळे “बकऱ्यांची गाय” म्हणून ओळखली जाते. ही शेळी दररोज सुमारे २ ते ३ लिटर दूध देते. तिच्या पिल्लांचे वाढीचे प्रमाण जलद असल्याने ती दूध आणि प्रजनन या दोन्हीसाठी फायदेशीर आहे.
वासनन जात
स्वित्झर्लंडमधून आलेली वासनन जात प्रामुख्याने दूध उत्पादनासाठी ओळखली जाते. ही शेळी दररोज ३ ते ४ लिटर दूध देते. तथापि, ही जात उष्ण प्रदेशांसाठी योग्य नसून, थंड हवामान असलेल्या डोंगराळ भागात तिचे पालन फायदेशीर ठरते.
बरबरी जात
उत्तर प्रदेश आणि उत्तर भारतातील बरबरी शेळी लहान आकाराची असली तरी ती दूध आणि मांस दोन्हीसाठी उपयुक्त आहे. दररोज १.५ ते २ लिटर दूध देणारी ही जात कमी चारा, कमी जागा आणि कमी खर्चात उत्तम नफा देते. त्यामुळे लघुउद्योजक आणि लहान शेतकऱ्यांसाठी ही सर्वोत्तम जात मानली जाते.
उस्मानाबादी जात
महाराष्ट्र, राजस्थान आणि दक्षिण भारतात प्रामुख्याने आढळणारी उस्मानाबादी शेळी मांस उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. सरासरी ३५ ते ४५ किलो वजन असलेली ही शेळी रोगप्रतिकारक्षम असून, तिचे मांस उच्च गुणवत्तेचे आणि महाग दराने विकले जाते.
दरम्यान, शेळीपालनामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे. सरकारकडूनही विविध अनुदान योजना, प्रशिक्षण शिबिरे आणि कर्जसुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. योग्य जातींची निवड, आरोग्याची काळजी आणि बाजारपेठेचे नियोजन केल्यास शेतकऱ्यांना कमी गुंतवणुकीतून अधिक उत्पन्न मिळवता येते.
