एकरी खर्च किती?
बीट शेतीतील खर्च खूप कमी येतो. एकरी बियाण्याचा खर्च साधारणपणे 700 ते 1,000 रुपये येतो. जमीन तयारीसाठी 2,000 ते 3,000 रुपये, खत-औषधे यासाठी 3,000 ते 4,000 रुपये, पाणी आणि मजुरीसाठी 2,500 ते 3,500 रुपये खर्च होतो. तणनाशके आणि ड्रीप व्यवस्थेसाठी सुमारे 1,500 ते 2,000 रुपये मोजावे लागतात. अशा प्रकारे एकरी एकूण खर्च 10,000 ते 14,000 रुपयांच्या दरम्यान येतो. या तुलनेत उत्पादन मोठ्या प्रमाणात मिळत असल्याने नफा देखील तितकाच जास्त मिळतो.
advertisement
उत्पन्न किती?
हवामान अनुकूल असेल तर बीटचे एकरी उत्पादन 100 ते 150 क्विंटल मिळू शकते. सरासरी 120 क्विंटल उत्पादन शेतकऱ्यांना सहसा मिळते. सध्या बाजारात बीटला घाऊक दराने प्रतिकिलो 8 ते 12 रुपये तर किरकोळ बाजारात 20 ते 30 रुपये दर मिळतो. जर घाऊक बाजार दर 10 रुपये गृहित धरला तर 12,000 किलो उत्पादनास अंदाजे 1,20,000 रुपये उत्पन्न मिळते. यातून खर्च वजा केल्यास शेतकऱ्याच्या हाती निव्वळ 1,00,000 ते 1,10,000 रुपयांचा नफा सहज मिळतो. कधी बाजारात भाव वाढल्यास हा नफा 1.5 लाख रुपयांपर्यंतही जाऊ शकतो.
बीट शेतीचे अनेक फायदे आहेत. हे पीक जलद वाढणारे असून त्याची बाजारात कायम मागणी असते. शिवाय बीट साठवून ठेवण्याची क्षमता जास्त असल्याने शेतकऱ्यांना तत्काळ विक्रीचा दबाव राहत नाही. सेंद्रिय पद्धतीनेही हे पीक सहज घेता येते. शहरातील बाजारपेठा, सुपरमार्केट, हॉटेल आणि थेट ग्राहकांना विक्री केल्यास आणखी चांगला भाव मिळतो. ग्रेडिंग, स्वच्छ धुतलेला माल आणि पॅकेजिंग केले तर बाजारभावात वाढ होते.
एकंदरीत पाहता, हिवाळ्यात बीट पिकाची शेती ही कमी खर्चात अधिक नफा देणारी शेती आहे. योग्य वेळेत पेरणी, वेळेवर खत-पाणी आणि बाजारपेठेचे नियोजन यामुळे शेतकरी एकरी लाखों रुपयांचा नफा मिळवू शकतात. त्यामुळे बीट शेती हिवाळ्यातील सर्वात कमाईचे पीक ठरत आहे.
